रेल्वेचे ओव्हर हेड ब्रेकर तुटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2016 12:55 AM2016-10-04T00:55:31+5:302016-10-04T00:55:31+5:30
देसाईगंज रेल्वेस्टेशनचे निर्माणाधिन कामे युध्दपातळीवर सुरू असून या कामांनी वेग घेतला आहे.
वाहनाची जबर धडक : रेल्वे वाहतूक पोलीस नेमण्याची गरज
देसाईगंज : देसाईगंज रेल्वेस्टेशनचे निर्माणाधिन कामे युध्दपातळीवर सुरू असून या कामांनी वेग घेतला आहे. दरम्यान रेल्वेचे विद्युतीकरण होत असल्याने रेल्वे विभागाने लावलेले दोन्ही बाजुचे ओव्हर हेड ब्रेकर एक महिन्याच्या फरकाने ओव्हरलोड वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या धडकेमुळे पूर्णत: तुटले आहेत. त्यामुळे येथे रेल्वे वाहतूक पोलीस नेमण्याची गरज निर्माण झाली आहे.
देसाईगंज रेल्वेस्टेशन हे देसाईगंज शहराच्या मध्यवर्ती भागात असल्याने या शहराची दोन भागात विभागणी झाली आहे. नॅरोगेज, ब्राडगेजमध्ये १९९३ ला रूपांतरीत झाले. तेव्हापासून बल्लारशहा ते गोंदिया या रेल्वे मार्गावर डिझेल इंजिनच्या माध्यमातून रेल्वे वाहतूक सुरू आहे. गोंदिया ते चंद्रपूर या डिझेल इंजिन मार्गावर आता रेल्वे विभागातर्फे रेल्वेचे इलेक्ट्रिकमध्ये रूपांतर होत असून त्यासाठी रेल्वे विद्युत खांब गोंदिया-चंद्रपूरपर्यंत उभारण्यात येणार असून विद्युत तार जोडणीचे काम सध्या अंतिम टप्प्यात आले आहे. यासाठी भूयारी व साध्या मार्गाच्या रेल्वेपटरी ओलांडून जाणाऱ्या वाहनांसाठी ओव्हर हाईट ब्रेकर लावण्यात आले आहेत. सदर ओव्हर लाईट ब्रेकर रेल्वेच्या नियमानुसार व ज्या उंचीवरून हायव्होल्टेज वायर रेल्वे इंजिनच्या निकषानुसार बसविण्यात आले आहेत. या संबंधाने वडसा रेल्वेच्या मुख्य फाटकावर एक महिन्याच्या आदी पूर्व दिशेच्या बाजुला ओव्हर हाईट ब्रेकर लावण्यात आले. परंतु २४ तासातच एका ट्रान्सपोर्ट वाहतूक ट्रकने ओव्हर हाईटच्या मध्यभागी ब्रेकरला धडक दिल्याने सदर ब्रेकर पूर्णत: वाकला. तसेच पश्चिम दिशेच्या बाजुला १५ दिवसांपूर्वी लावण्यात आलेले ओव्हर हाईट ब्रेकर सोमवारच्या रात्री अज्ञात वाहनाने धडक दिल्याने वाकलेल्या अवस्थेत आहे. अशा प्रकारे रेल्वे विभागाने लावलेले दोन्ही ब्रेकर पूर्णत: निकामी झाले आहेत. रेल्वे फाटकाच्या पूर्व, पश्चिम दिशेला दर्शनी भागातच रेल्वे विभागाने सदर ब्रेकर लावावेत, जोपर्यंत भूयारी मार्ग सुरू होत नाही, तो पर्यंत सदर ब्रेकर लावू नये, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)
जीवितहानीची शक्यता बळावली
सदर लावलेले दोन्ही हाईट ब्रेकर एकदम रेल्वे फाटकाच्या जवळ असल्याने ट्रक चालकाला उंचीचा अंदाज येत नाही. त्यामुळे ट्रक पूर्णपणे पश्चिमेकडील ब्रेकरच्या जवळ गेल्यावर उंची जास्त असल्याने ब्रेकरमधून ट्रक जाऊ शकत नाही. परिणामी फाटकाजवळच वाहतुकीची कोंडी निर्माण होते. जोराने धक्का लागल्यास शेकडो टन वजनाचा ब्रेकर खाली आल्यास जीवितहानीची शक्यता अधिक असते.