४८ कोटींची स्वामित्वधन वसुली
By admin | Published: May 8, 2017 01:21 AM2017-05-08T01:21:42+5:302017-05-08T01:21:42+5:30
सन २०१६-१७ या चालू वर्षात एप्रिल ते ३१ मार्च २०१७ या वर्षभराच्या कालावधीत जिल्ह्यातील गौण खनिजाच्या लीज,
वर्षभरात : ३३ कोटींचे प्रशासनाला होते उद्दिष्ट; वसुलीची टक्केवारी १४५ वर पोहोचली
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : सन २०१६-१७ या चालू वर्षात एप्रिल ते ३१ मार्च २०१७ या वर्षभराच्या कालावधीत जिल्ह्यातील गौण खनिजाच्या लीज, परमिट तसेच रेती परमिट व रॉयल्टीमधून एकूण ४८ कोटी १८ लाख ३७ हजार ३२ रूपयांचा महसूल जिल्हा प्रशासनामार्फत शासनाला प्राप्त झाला आहे. गडचिरोली जिल्ह्यात सदर गौण खनिज स्वामित्वधन वसुलीची सरासरी टक्केवारी १४६.०१ आहे. विशेष म्हणजे, शासनाने जिल्हा प्रशासनाला सन २०१६-१७ या वर्षाकरिता ३३ कोटी रूपयांच्या महसुलाचे उद्दिष्ट दिले होते. प्रशासनाने वर्षभरात उद्दिष्टापेक्षा अधिक महसूल प्राप्त केला आहे.
गडचिरोली जिल्ह्यात नदी व नाल्याची संख्या मोठी असल्याने रेतीघाट मोठ्या प्रमाणात आहेत. याशिवाय गिट्टी, मुरूम, माती, दगडाच्या खाणीही मोठ्या प्रमाणात आहेत. या खाणीतून गौण खनिजाचे तसेच रेतीघाटावरून रेतीचे उत्खनन करण्यासाठी शासनाच्या नियमानुसार संबंधित कंत्राटदाराला आॅनलाईन लिलाव प्रक्रियेत भाग घेऊन परवाना घ्यावा लागतो.
त्यानंतरच सदर कंत्राटदार आपल्या विशिष्ट क्षेत्रातून गौण खनिजाचे उत्खनन व वाहतूक नियमानुसार करीत असते. गौण खनिजाच्या उत्खनन व वाहतुकीच्या कामासाठी संबंधित कंत्राटदाराला लीज व परमिट घ्यावा लागतो. यासाठी विविध विभागाकडून जिल्हा खनिकर्म विभागाला महसूल प्राप्त होत असतो.
राज्य शासनाने सन २०१६-१७ या वर्षात गडचिरोली जिल्हा प्रशासनाला गौण खनिज स्वामित्वधन वसुलीबाबत ३३ कोटींचे सुधारित उद्दिष्ट दिले होते. १२ तालुक्यातील सहा उपविभाग मिळून आतापर्यंत एकूण ४८ कोटी १८ लाख ३७ हजार ३२ रूपयांचा महसूूल मिळाला आहे. स्वामित्वधन वसुलीत अहेरी उपविभाग सर्वाधिक आघाडीवर आहे. या उपविभागाने एकूण ३० कोटी ९० लाख ७२ हजार ४१९ रूपयांचा महसूल मिळविला आहे.
अनेक तालुक्याच्या महसूल प्रशासनाने अवैध गौणखनिज उत्खनन व वाहतुकीबाबत धाडसत्र राबवून शेकडो कंत्राटदाराविरोधात कारवाई केली. त्यांच्याकडून लाखो रूपयांचा दंडही वर्षभरात वसूल केला आहे.
चार तालुके महसुलात आघाडीवर
गौणखनिज स्वामित्वधन वसुलीत गडचिरोली, मुलचेरा, कोरची व सिरोंचा हे चार तालुके आघाडीवर आहेत. या चारही तालुक्यातील प्रशासनाने १०० टक्क्यावर स्वामित्वधन वसुली केली आहे. गडचिरोली तालुक्याच्या स्वामित्वधन वसुलीची टक्केवारी १०६.०७, मुलचेरा १०५.३६, कोरची ११४.५३ व सिरोंचा तालुक्यातील स्वामित्वधन प्राप्त महसुलाची टक्केवारी सर्वाधिक २५३.९९ आहे. महसुलामध्ये सिरोंचा तालुका गडचिरोली जिल्ह्यात प्रथमस्थानी आहे.