आठ तालुक्यांत होणार प्राणवायू निर्मिती प्रकल्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 05:00 AM2021-04-29T05:00:00+5:302021-04-29T05:00:58+5:30
जिल्ह्यात ही परिस्थिती उद्भवू नये यासाठी गडचिरोली शहरातील दोन प्रमुख सरकारी रुग्णालयांसह इतर ८ तालुका मुख्यालयी ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारले जाणार आहेत. त्याबाबतची चाचपणी आरोग्य विभागाने केली आहे. गेल्या आठवड्यात पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या आढावा बैठकीत या विषयावर चर्चा झाली. त्यानंतर आमदार डॉ. देवराव होळी व आमदार कृष्णा गजबे यांनी आपल्या स्थानिक विकास निधीतून त्यासाठी निधी देण्याची इच्छा व्यक्त केली.
लाेकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : कोरोनाच्या प्रकोपाने त्रस्त झालेल्या रुग्णांना प्राणवायू (ऑक्सिजन) मिळत नसल्यामुळे त्यांचा जीव धोक्यात येत आहे. याच समस्येतून अनेकांना प्राणही गमवावे लागले.
जिल्ह्यात ही परिस्थिती उद्भवू नये यासाठी गडचिरोली शहरातील दोन प्रमुख सरकारी रुग्णालयांसह इतर ८ तालुका मुख्यालयी ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारले जाणार आहेत. त्याबाबतची चाचपणी आरोग्य विभागाने केली आहे. गेल्या आठवड्यात पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या आढावा बैठकीत या विषयावर चर्चा झाली. त्यानंतर आमदार डॉ. देवराव होळी व आमदार कृष्णा गजबे यांनी आपल्या स्थानिक विकास निधीतून त्यासाठी निधी देण्याची इच्छा व्यक्त केली.
जिल्ह्यात एकूण १० ऑक्सिजन प्रकल्प उभारण्याचे नियोजन आहे. त्यातील पाच प्रकल्पांसाठी राज्य सरकारकडून निधी दिला जाणार असून, त्याला मंजुरी मिळाल्याचे सांगितले जात आहे.
अशा पद्धतीचे ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प जिल्ह्यात कुठेही कार्यरत नसून, कुठे किती क्षमतेचे प्रकल्प उभारले जाऊ शकतात याबाबतची माहिती जिल्हा शल्य चिकित्सकांनी राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान संचालनालयाकडे पाठविली.
मिनिटाला १८१ ते १२०० लिटर ऑक्सिजन निर्मिती
हवेतून ऑक्सिजन निर्मितीच्या या प्रकल्पाची क्षमता वेगवेगळी राहणार आहे. देसाईगंज, कोरची, चामोर्शी, एटापल्ली आणि सिरोंचा येथे प्रतिमिनिट १८१ लिटर ऑक्सिजन निर्मितीची क्षमता असणारे युनिट लागणार आहे. अहेरी, आरमोरी आणि कुरखेडा येथे प्रतिमिनिट ३४० लिटर ऑक्सिजन निर्मिती, तर जिल्हा महिला रुग्णालयात ६११ लिटर प्रतिमिनिट आणि जिल्हा सामान्य रुग्णालयात १२०० लिटर प्रतिमिनिट ऑक्सिजन निर्मितीची क्षमता असणारे युनिट लागणार आहे.
स्थायी सुविधा मिळणार
ऑक्सिजन निमिर्तीचे हे प्रकल्प केवळ काेराेना काळातच नाही तर भविष्यातही विविध आजारांच्या गरजवंत रुग्णांसाठी उपयाेगाचे ठरणार आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात आराेग्यविषयक सुविधांची कमतरता आहे. ऑक्सिजनच्या प्रकल्पामुळे ही एक स्थायी सुविधा हाेणार आहे.