शासन व संस्थेच्या नावाखाली पानठेला चालकांकडून पैसे उकळणाऱ्यास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2020 03:14 PM2020-09-10T15:14:13+5:302020-09-10T15:16:49+5:30
राज्य शासन, जिल्हा प्रशासन व सर्च संस्थेच्या नावाखाली खेड्यापाड्यातील पानठेला चालकांकडून अवैधरित्या पैसे लुबाडणाऱ्या इसमास धानोरा पोलिसांनी अटक केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : राज्य शासन, जिल्हा प्रशासन व सर्च संस्थेच्या नावाखाली खेड्यापाड्यातील पानठेला चालकांकडून अवैधरित्या पैसे लुबाडणाऱ्या इसमास धानोरा पोलिसांनी अटक केली. जिल्हा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. इम्रान शेख रा.गडचिरोली असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
तंबाखू नियंत्रण कायद्याची अंमलबजावणी झाल्यापासून जिल्ह्यातील पानठेले बंद आहेत. परंतु अजूनही जिल्ह्यातील पानठेला चालकांकडून तंबाखू व खर्रा विक्री सुरूच आहे. त्यामुळे प्रशासन पानठेले, दुकानांची तपासणी करून तंबाखूजन्य पदार्थ जप्त करीत आहे. हीच बाब हेरून पानठेला चालक-मालक या बनावट संघटनेचा अध्यक्ष असलेल्या इम्रान शेख आपल्या साथीदारांसोबत खेड्यापाड्यात जाऊन पानठेला चालकांकडून पैसे वसूल करीत होता. आम्ही सर्च संस्थेतून, जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या तंबाखू नियंत्रण विभागातून आल्याचे सांगत तो पानठेला चालकांकडून रक्कम वसूल करायचा. तसेच बनावट शिक्का व स्वाक्षरी असलेली पावती देखील शेख पानठेला चालकांना द्यायचा. याबाबतची माहिती जिल्हा तंबाखू सल्लागार डॉ. नंदू मेश्राम यांना कळताच प्रकरणाची शहानिशा करून त्यांनी धानोरा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार धानोरा पोलिसांनी इम्रान शेख व अन्य दोघांवर ३० सप्टेंबर रोजी भादंविचे कलम ४६५,४६९, ४७२, ४२०, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला.
गुन्हा दाखल झाल्यापासून इम्रान शेख फरार होता. दरम्यान धानोरा पोलिसांनी तपासचक्र फिरवून इम्रान शेखला अटक केली. त्याला गडचिरोलीच्या जिल्हा न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
कोरोना संसर्गामुळे पानठेले बंद ठेवण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाच्या वतीने सर्व पानठेलाधारकांना देण्यात आले आहे. असे असतानासुद्धा काही पानठेलाधारक छुप्या मार्गाने सुगंधित तंबाखू व खर्राची विक्री करीत आहेत. दरम्यान गडचिरोली शहरासह अनेक ठिकाणच्या चौकात ‘खर्रा पाहिजे काय’ असे दबक्या आवाजात शौकीनांना पानठेला चालकांकडून विचारले जात आहे.
भूलथापांना बळी पडू नका; पोलिसांचे आवाहन
शासनाच्या नावावर पानठेला चालकांकडून अवैधरित्या रक्कम वसूल करण्याचा गोरखधंदा सुरु असून सामान्य जनता व शासनाची फसवणूक केल्या जात आहे. अशा कोणत्याही व्यक्तीस, संघटनेच्या भूलथापांना बळी पडू नका. आजपावेतो अशा प्रकारे फसवणूक झालेले पानठेलाधारक पावतीसह धानोरा पोलीस ठाण्यात येऊन गुन्ह्याच्या तपासकामी सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस विभागाने केले आहे.
संघटनेची नोंदच नाही
पानठेला चालक-मालक संघटना या नावाने गडचिरोली जिल्ह्यामध्ये सहायक धर्मदाय आयुक्त यांच्या कार्यालयात कुठेही नोंद नाही. या संघटनेच्या कोणत्याही स्वयंघोषित पदाधिकारी यांना तंबाखू विषयी कारवाई करून दंडात्मक रक्कम वसूल करण्याचे कोणतेही अधिकार शासनाने प्रदान केले नाही. आरोपी इम्रान शेख यांनी पानठेलाधारकांना दंडात्मक कारवाई करीत असल्याचे भासवून पैसे वसूल केले आहे. तसेच काही दिवसांपूर्वी संघटनेच्या नावावर पैसे उकळून पानठेलाधारकांची सर्रास फसवणूक केली आहे. यामुळे पानठेलाधारकांनी आरोपीप्रती रोष व्यक्त केला आहे.