धान पीक रोवणी ४४ टक्के
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2018 10:29 PM2018-07-29T22:29:46+5:302018-07-29T22:30:22+5:30
सन २०१८ च्या खरीप हंगामात जिल्ह्याच्या बाराही तालुक्यात मिळून आतापर्यंत एकूण ५३ टक्के इतकी खरीप पिकांची लागवड करण्यात आली आहे. आवत्या व रोवणी मिळून धान पिकाची लागवड ४४ टक्क्यांवर पोहोचली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : सन २०१८ च्या खरीप हंगामात जिल्ह्याच्या बाराही तालुक्यात मिळून आतापर्यंत एकूण ५३ टक्के इतकी खरीप पिकांची लागवड करण्यात आली आहे. आवत्या व रोवणी मिळून धान पिकाची लागवड ४४ टक्क्यांवर पोहोचली आहे. सध्या रोवणीचा हंगाम सर्वत्र जोमात सुरू आहे.
खरीप पिकाचे जिल्ह्यात एकूण १ लाख ५१ हजार २०८ हेक्टर क्षेत्र इतके क्षेत्र आहे. १ लाख ५३ हजार २२८ इतके सर्वसाधारण क्षेत्र आहे. कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार, १३ हजार ६७७ हेक्टर क्षेत्रात धानाचे पºहे टाकण्यात आले आहे. ३८ हजार १५ हेक्टर क्षेत्रावर धान पिकाची रोवणी आतापर्यंत झाली आहे. २९ हजार १४ इतक्या हेक्टर क्षेत्रात यंदा आवत्या टाकण्यात आल्या आहेत. गडचिरोली तालुक्यात रोवणी व आवत्या मिळून एकूण ६ हजार ८८५ हेक्टर क्षेत्रात धान पिकाची लागवड करण्यात आली आहे. कुरखेडा तालुक्यात ५ हजार १०० हेक्टर क्षेत्रात, आरमोरी ७ हजार ७८० हेक्टर, चामोर्शी ९ हजार ५३६ हेक्टर, सिरोंचा १ हजार १७५ हेक्टर, अहेरी ४ हजार ८५७ हेक्टर, एटापल्ली ४ हजार ७५० हेक्टर, धानोरा १० हजार ४६४ हेक्टर, कोरची ६ हजार ३४३ हेक्टर, देसाईगंज ५ हजार १४० हेक्टर, मुलचेरा २ हजार १५० हेक्टर व भामरागड तालुक्यात २ हजार ८५० हेक्टर क्षेत्रावर धान पिकाची लागवड करण्यात आली आहे.
यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ३ हजार ९१० हेक्टर क्षेत्रावर सोयाबिनची पेरणी करण्यात आली आहे. यामध्ये गडचिरोली तालुक्यात ४ हेक्टर, चामोर्शी तालुक्यात ३१ हेक्टर, सिरोंचा तालुक्यात ५३ हेक्टर व भामरागड तालुक्यात ८८ हेक्टर क्षेत्रावर सोयाबिनची पेरणी आटोपली आहे. खरीपातील सर्व पिकांची मिळून एकूण ८८ हजार ६०० हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. याची टक्केवारी ५३ आहे. १ हजार ६६१ हेक्टर क्षेत्रावर मका पिकाची लागवड करण्यात आली आहे. अनेक शेतकऱ्यांनी सलग परसबागही फुलविली आहे. ४६८ हेक्टर क्षेत्रावर इतर तृणधान्याची पेरणी करण्यात आली आहे. सध्या जिल्ह्याच्या बाराही तालुक्यात धान पीक रोवणीच्या कामास वेग आला आहे. त्यामुळे शेत मालकांना मजूर मिळणे कठीण झाले आहे. ट्रॅक्टरच्या सहाय्याने चिखलणी सुरू आहे.
१३ हजार ४६९ हेक्टरवर कापूस पिकाची लागवड
जिल्ह्यात धान हे प्रमुख पीक असले तरी जिल्ह्यातील शेतकरी आता धानासोबतच कापूस पिकाकडेही वळले आहेत. यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यात एकूण १३ हजार ४६९ हेक्टरवर कापूस पिकाची लागवड करण्यात आली आहे. यामध्ये गडचिरोली, चामोर्शी, आरमोरी, सिरोंचा, देसाईगंज तालुक्यांचा समावेश आहे.