१२ टक्क्यांनी धान खरेदी घटली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2018 12:35 AM2018-01-18T00:35:44+5:302018-01-18T00:36:25+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : गतवर्षीच्या तुलनेत यंदा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे धानाचे उत्पादन कमी झाले आहे. यंदाच्या खरीप हंगामात अत्यल्प पाऊस झाला. तसेच विविध प्रकारच्या रोगाचा धानपिकावर मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाला. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हाती ५० ते ६० टक्केच उत्पादन आले. याचा परिणाम आदिवासी विकास महामंडळाच्या धान खरेदीवर झाला आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा याच तारखेत तब्बल १२.४० टक्क्यांनी महामंडळाची धान खरेदी घटली आहे.
खरीप पणन हंगाम २०१६-१७ मध्ये आधारभूत खरेदी योजनेअंतर्गत १६ जानेवारी २०१७ अखेर जिल्हाभरात सर्व केंद्रांवर मिळून ३ लाख ७४ हजार ६९ क्विंटल धानाची खरेदी झाली होती. यंदा याच तारखेला याच योजनेअंतर्गत ३ लाख ३२ हजार ७९९ क्विंटल इतकी खरेदी झाली आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा ४१ हजार २७० क्विंटलने धान खरेदी घटली आहे.
आदिवासी विकास महामंडळाच्या गडचिरोलीच्या प्रादेशिक कार्यालयामार्फत यंदाच्या खरीप पणन हंगामात ५३ धान खरेदी केंद्रांना मंजुरी प्रदान करण्यात आली. सर्वच खरेदी केंद्र सुरू झाले असून आतापर्यंत ५२ केंद्रावर धानाची आवक झाली आहे. १६ जानेवारी अखेरपर्यंत ५२ केंद्रावर ४० कोटी १९ लाख ७४ हजार ६९० रूपये किंमतीच्या २ लाख ५९ हजार ३३८ क्विंटल धानाची खरेदी झाली आहे. अहेरी कार्यालयाअंतर्गत ३४ केंद्रांना मंजुरी देण्यात आली असून ३१ केंद्र सुरू झाले आहेत. यापैकी २९ केंद्रावर धानाची आवक झाली असून आतापर्यंत ११ कोटी ३८ लाख ६५ हजार २६३ रूपये किंमतीच्या ७३ हजार ४६१ क्विंटल धानाची खरेदी झाली आहे. गतवर्षी १६ जानेवारी २०१७ अखेरपर्यंत ३ लाख ७४ हजार ६९ क्विंटल धानाची खरेदी झाली होती. गतवर्षीच्या तुलनेत यंदा ४१ हजार २७० क्विंटल इतकी धान खरेदी घटली आहे. धान खरेदी घटीची टक्केवारी १२.४० आहे.
कुरखेडा उपप्रादेशिक कार्यालयाअंतर्गत गोठणगाव, नान्ही, कुरखेडा, सोन्सरी, खरकाडा, आंधळी, कढोली, गेवर्धा, पलसगड व शिरपूर या १० धान खरेदी केंद्रावर १६ जानेवारी अखेरपर्यंत ९ कोटी ८६ लाख १ हजार ९९४ रूपये किंमतीच्या एकूण ६३ हजार ६१४ क्विंटल धानाची खरेदी झाली आहे. कोरची उपप्रादेशिक कार्यालयाअंतर्गत रामगड, येंगलखेडा, मालेवाडा, पुराडा, खेडेगाव, कोरची, बेतकाठी, बोरी, मरकेकसा, कोटरा, गॅरापत्ती, बेडगाव, मसेली या १३ धान खरेदी केंद्रावर ११ कोटी ५ लाख ७८ हजार ३८ रूपये किंमतीच्या ७१ हजार ३४० क्विंटल इतकी धान खरेदी झाली आहे.
आरमोरी उपप्रादेशिक कार्यालयाअंतर्गत अंगारा, उराडी, देलनवाडी, दवंडी, कुरंडीमाल, पोटेगाव, चांदाळा, मौशीखांब, पिंपळगाव, विहिरगाव आदी १० धान खरेदी केंद्रावर आतापर्यंत ७ कोटी २८ हजार २५६ रूपये किंमतीच्या ४५ हजार १७९ क्विंटल इतकी धान खरेदी झाली आहे.
धानोरा उपप्रादेशिक कार्यालयाअंतर्गत मुरूमगाव, धानोरा, रांगी, सुरसुंडी, सोडे, गट्टा, दुधमाळा, मोहली, पेंढरी, कारवाफा या १० धान खरेदी केंद्रावर आतापर्यंत ५ कोटी ८५ लाख ५८ हजार ११६ रूपये किंमतीच्या एकूण ३७ हजार ७७९ क्विंटल धानाची खरेदी झाली आहे.
घोट उपप्रादेशिक कार्यालयाअंतर्गत रेगडी, मक्केपल्ली, भाडभिडी (बी.), गुंडापल्ली, आमगाव, मार्र्कं डा, गिलगाव, अड्याळ, सोनापूर व घोट आदी १० धान खरेदी केंद्रावर ६ कोटी ४२ लाख ८ हजार २८५ रूपये किंमतीच्या एकूण ४१ हजार ४२४ क्विंटलची धान खरेदी झाली आहे. यावर्षी धान खरेदीत घट आली आहे.
२२ कोटींचे धान चुकारे प्रलंबित
आदिवासी विकास महामंडळाने गेल्या दोन वर्षांपासून आॅनलाईन धान चुकाऱ्याची प्रक्रिया सुरू केली आहे. शेतकºयांना प्रतीक्षा करावी लागू नये, तसेच त्यांना लवकर चुकाऱ्याची रक्कम प्राप्त व्हावी, याकरिता आदिवासी विकास महामंडळाच्या खरेदी केंद्रावर धान विक्री करणाऱ्या संबंधित शेतकऱ्याच्या बँक खात्यात चुकाऱ्याची रक्कम अदा केली जाते. मात्र यंदाच्या खरीप हंगामातील ५ हजार ६६५ शेतकऱ्यांचे २२ कोटी ८१ लाख ९६ हजार ३४७ रूपयांचे धान चुकारे प्रलंबित आहेत. परिणामी धानाची विक्री करूनही संबंधित शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहे. महामंडळ व आविका संस्थेने लगबगीने कार्यवाही करून प्रलंबित धान चुकारे तत्काळ अदा करावे, अशी मागणी शेतकºयांनी केली आहे.