संस्थांच्या आडकाठीने अहेरीत धान खरेदी बंदच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2017 12:35 AM2017-12-02T00:35:27+5:302017-12-02T00:35:44+5:30
आदिवासी विकास महामंडळाच्या अहेरी उपप्रादेशिक कार्यालयामार्फत अहेरी उपविभागात असलेल्या ३३ धान खरेदी केंद्रांना जिल्हाधिकाºयांनी यंदाच्या खरीप हंगामात मंजुरी प्रदान केली आहे.
ऑनलाईन लोकमत
गडचिरोली : आदिवासी विकास महामंडळाच्या अहेरी उपप्रादेशिक कार्यालयामार्फत अहेरी उपविभागात असलेल्या ३३ धान खरेदी केंद्रांना जिल्हाधिकाऱ्यांनी यंदाच्या खरीप हंगामात मंजुरी प्रदान केली आहे. मात्र गतवर्षी खरेदी केलेल्या धानाच्या कमिशनच्या मुद्यावर आक्रमक पवित्रा घेत आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी यंदाच्या खरीप हंगामात धान खरेदी केंद्र सुरू करण्यास नकार दिला आहे. त्यामुळे अहेरी उपविभागात अद्यापही ३० धान खरेदी केंद्र सुरू होण्याच्या प्रतिक्षेत आहे. विशेष म्हणजे, आतापर्यंत अहेरी उपविभागात महामंडळाच्या केंद्रावर धान खरेदी झाली नाही.
आदिवासी विकास महामंडळाच्या अहेरी प्रादेशिक कार्यालयांतर्गत सहकारी संस्थांच्या वतीने अहेरी उपविभागातील अंकिसा, आसरअल्ली, अमरादी या ठिकाणचे तीन धान खरेदी केंद्र बुधवारी व गुरूवारी रितसर उद्घाटन करून सुरू करण्यात आले आहे, अशी माहिती मिळाली आहे.
अहेरी उपप्रादेशिक कार्यालयांतर्गत मुलचेरा, भामरागड, एटापल्ली, सिरोंचा व अहेरी आदी पाच तालुक्यात आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थांमार्फत धान खरेदी केंद्र सुरू करून दरवर्षी लाखो क्विंटल धानाची खरेदी केली जाते. मात्र कमिशनच्या मुद्यावरून संस्थांनी आदिवासी विकास महामंडळाचे धान खरेदीच्या कामात पंचाईत केली आहे.
अहेरी उपविभागातही धानाची कापणी व बांधणीचे काम अंतिम टप्प्यात आहे. हलक्या प्रतीच्या धानाची मळणीही झाली आहे. मात्र महामंडळाचे धान खरेदी केंद्र सुरू न झाल्याने शेतकºयांची अडचण झाली आहे.
आता संस्थाच नियुक्त करणार प्रतवारीकार
आदिवासी विकास महामंडळाच्या सर्वच कार्यालयात पुरेशा मनुष्यबळाचा अभाव आहे. पदे रिक्त असल्याने महामंडळाला प्रतवारीकार नियुक्त करणे शक्य होत नाही. त्यामुळे आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थांनीच आपल्या संबंधित केंद्रांवर प्रतवारीकार (ग्रेडर)ची नियुक्ती करावी, असा निर्णय महामंडळाच्या संचालक बोर्डांनी घेतला आहे. त्यामुळे आता केंद्रांवर प्रतवारीकाराची नियुक्ती संस्थेकडूनच होणार आहे. प्रतवारीकाराला महामंडळातर्फे क्विंटलमागे पाच रूपये देण्यात येणार आहे. या संदर्भातील प्रशिक्षण गडचिरोली येथे शनिवारी आयोजित करण्यात आले आहे. या प्रशिक्षणाच्या निमित्ताने महामंडळाचे नाशिक येथील वरिष्ठ अधिकारी गडचिरोलीत येत आहेत. या प्रशिक्षण बैठकीत अहेरी उपविभागातील सहकारी संस्थांकडून धान खरेदी केंद्र सुरू करण्यावर तोडगा निघण्याची शक्यता आहे.
२०१६-१७ च्या खरीप हंगामातील आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थांचे धान खरेदीपोटीचे ४० टक्के कमिशन हुंडीमध्ये अदा करण्यात आले. तर खरेदी हंगाम आटोपल्यावर केंद्रावरून धानाची उचल झाल्यानंतर घटीतुटीचा हिशोब करण्यात आला. त्यानंतर संस्थांना ६ लाख १० हजार २५ रूपये इतके ६० टक्के कमिशन अदा करण्यात आले आहे. संस्थांची धान खरेदी हंगामातील दोन टक्के शासनाकडून मान्य केली जाते.
- आशिष मुळेवार, उपप्रादेशिक व्यवस्थापक अहेरी