धान खरेदी आठ कोटींवर पोहोचली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2017 11:42 PM2017-12-06T23:42:04+5:302017-12-06T23:42:25+5:30
आदिवासी विकास महामंडळाच्या वतीने आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थांमार्फत ५ डिसेंबरपर्यंत ८ कोटी ६० लाख ८ हजार ८९७ रूपये किंमतीच्या एकूण ५२ हजार ५ क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली आहे.
आॅनलाईन लोकमत
गडचिरोली : आदिवासी विकास महामंडळाच्या वतीने आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थांमार्फत ५ डिसेंबरपर्यंत ८ कोटी ६० लाख ८ हजार ८९७ रूपये किंमतीच्या एकूण ५२ हजार ५ क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली आहे. गडचिरोली प्रादेशिक कार्यालयाअंतर्गत आतापर्यंत ३८ धान खरेदी केंद्रांवर धानाची प्रत्यक्ष आवक झाली आहे.
आदिवासी विकास महामंडळाच्या गडचिरोली प्रादेशिक कार्यालयाअंतर्गत यंदा २०१७-१८ च्या खरीप पणन हंगामात आधारभूत खरेदी योजनेअंतर्गत एकूण ५२ धान खरेदी केंद्राला मंजुरी प्रदान करण्यात आली. यापैकी आतापर्यंत ४० केंद्र सुरू झाले असून ३८ केंद्रांवर धानाची आवक झाली आहे.
कुरखेडा उपप्रादेशिक कार्यालयाच्या हद्दीतील कुरखेडा, गोठणगाव, नान्ही, सोनसरी, खरकाडा, आंधळी, कढोली, गेवर्धा व देऊळगाव या नऊ केंद्रांवर आतापर्यंत एकूण १६ हजार ८७ क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली असून या धानाची किंमत २ कोटी ४९ लाख ३५ हजार ४७० रूपये आहे. विशेष म्हणजे पलसगड येथील धान खरेदी केंद्र मंजूर करण्यात आले आहे. मात्र या केंद्रावर अद्यापही धानाची आवक झाली नसून येथील खरेदी शून्य आहे.
कोरची उपप्रादेशिक कार्यालयाअंतर्गत रामगड, येंगलखेडा, मालेवाडा, पुराडा, खेडेगाव, कोरची, बेतकाठी, बोरी, मर्केकसा, कोटरा, बेडगाव व मसेली या १२ केंद्रांवर ५ डिसेंबरपर्यंत एकूण २ कोटी ४६ लाख ५१ हजार ९१३ रूपये किंमतीच्या १५ हजार ९०४ क्विंटल इतक्या धानाची खरेदी झाली आहे.
आरमोेरी उपप्रादेशिक कार्यालयाअंतर्गत उराडी, देलनवाडी, दवंडी, कुरंडी माल, चांदाळा, मौशिखांब, पिंपळगाव, विहीरगाव आदी सात केंद्रांवर आतापर्यंत एकूण १ कोटी ४९ लाख ९५ हजार २२७ रूपये किंमतीच्या ९ हजार ६७४ क्विंटल इतक्या धानाची खरेदी झाली आहे.
धानोरा उपप्रादेशिक कार्यालयाअंतर्गत मुरूमगाव, धानोरा, रांगी, सुरसुंडी, मोहली आदी पाच केंद्रांवर आतापर्यंत एकूण ४ हजार २७८ क्विंटल धानाची खरेदी झाली असून या धानाची किंमत ६६ लाख ३१ हजार ८९२ रूपये आहे. सदर उपप्रादेशिक कार्यालयाअंतर्गत सुरसुंडी, सोडे, गट्टा, पेंढरी व कारवाफा आदी पाच धान खरेदी केंद्रावर अद्यापही शेतकºयांनी धान विक्रीसाठी आणले नाही.
घोट उपप्रादेशिक कार्यालयाअंतर्गत रेगडी, घोट, मक्केपल्ली, भाडभिडी (बी.), गुंडापल्ली आदी पाच केंद्रांवर आतापर्यंत ९३ लाख ९४ हजार ३९५ रूपये किंमतीच्या ६ हजार ६० क्विंटल धानाची खरेदी झाली आहे. घोेट परिसरात आमगाव, मार्र्कंडा, गिलगाव, अड्याळ, सोनापूर आदी पाच धान खरेदी केंद्रावर धानाची आवक अद्यापही झाली नाही. धान मळणीचे काम आता सुरू आहे.
धान चुकारे अदा करण्यास दिरंगाई
आदिवासी विकास महामंडळाचे वरिष्ठ अधिकाºयांनी गडचिरोलीत प्रतवारी प्रशिक्षणानिमित्त हजेरी लावली होती. दरम्यान त्यांनी आॅनलाईन पद्धतीने धानाचे चुकारे गतीने करण्यात येतील, असे सांगितले होते. मात्र शेतकºयांना धान चुकाºयाची रक्कम अदा करण्यात दिरंगाई होत असल्याचे दिसून येत आहे. ८ कोटी ६० लाखांपैकी ३० ते ३५ टक्के रक्कम अदा करण्यात आली आहे. उर्वरित रकमेचे चुकारे प्रलंबित असल्याची माहिती आहे.
रोगाच्या प्रादुर्भावाने यंदा धान उत्पादनात घसरण
गतवर्षी निसर्गाने साथ दिल्यामुळे गडचिरोली जिल्ह्यातील शेतकºयांना धानाचे उत्पादन चांगले झाले होते. मात्र यंदाच्या खरीप हंगामात धान गर्भात असताना मावा, तुडतुडा, लष्कर अळी, खोडकिडा आदींसह विविध रोगांचा प्रादुर्भाव धानपिकावर मोठ्या प्रमाणावर झाला. परिणामी धानाच्या उत्पादनात घट आली आहे. मळणी केलेले शेतकरी ५० ते ६० टक्केच उत्पादन हाती आले असल्याची माहिती लोकमतशी बोलताना दिली आहे. धानाचे उत्पादन घटल्यामुळे महामंडळाची धान खरेदी यंदा कमी होणार आहे. गतवर्षी डिसेंबर महिन्यात महामंडळामार्फत जिल्हाभरात धानाची खरेदी १ लाख क्विंटलच्या आसपास पोहोचली होती. मात्र यंदा महामंडळाची धान खरेदी अर्ध्यावर असल्याचे दिसून येत आहे. अहेरी उपविभागात धान खरेदी केंद्र सुरू करण्यात न आल्याने शेतकºयांना अडचणी जाणवत आहेत. महामंडळाने तत्काळ खरेदी केंद्र सुरू करावे, अशी मागणी आहे.