यंदा १० लाख क्विंटलवर पोहोचणार धान खरेदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2019 01:12 AM2019-02-03T01:12:06+5:302019-02-03T01:12:33+5:30
गतवर्षीच्या तुलनेत यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यात धानाचे उत्पादन बऱ्यापैकी झाल्याने महामंडळाच्या विविध केंद्रांवर धानाची आवक सुरूच आहे. महामंडळाच्या जिल्हाभरातील एकूण ८६ केंद्रावरून १ फेब्रुवारीपर्यंत ६ लाख ४१ हजार ५४० क्विंटल इतकी धान खरेदी झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : गतवर्षीच्या तुलनेत यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यात धानाचे उत्पादन बऱ्यापैकी झाल्याने महामंडळाच्या विविध केंद्रांवर धानाची आवक सुरूच आहे. महामंडळाच्या जिल्हाभरातील एकूण ८६ केंद्रावरून १ फेब्रुवारीपर्यंत ६ लाख ४१ हजार ५४० क्विंटल इतकी धान खरेदी झाली आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा धानाची खरेदी वाढणार असून १० लाख क्विंटलवर ही धान खरेदी पोहोचण्याची शक्यता आहे.
आदिवासी विकास महामंडळाच्या वतीने आविका संस्थांमार्फत दरवर्षी जिल्हाभरात धानाची खरेदी केली जाते. धान खरेदीसाठी महामंडळाने यंदाच्या हंगामात आधारभूत खरेदी योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत मंजूर व सुरू केलेल्या सर्वच ८६ केंद्रांवर धानाची आवक बºयापैकी झाली आहे. १ फेब्रुवारीपर्यंत जिल्हाभरातील एकूण २१ हजार ५५५ शेतकºयांनी ६ लाख ४१ हजार ५४० इतकी धानाची विक्री आविका संस्थांच्या केंद्रावरून केली आहे. या सर्व धानाची किंमत १ अब्ज १२ कोटी २६ लाख ९५ हजार ५९५ रूपये इतकी आहे. गडचिरोली प्रादेशिक कार्यालयांतर्गत यंदाच्या खरीप हंगामासाठी ५१ तर अहेरी उपप्रादेशिक कार्यालयांतर्गत ३५ अशी एकूण ८६ खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहेत.
कुरखेडा उपप्रादेशिक कार्यालयांतर्गत १० धान खरेदी केंद्र, कोरची कोरची उपप्रादेशिक कार्यालयांतर्गत १३, आरमोरी उपप्रादेशिक कार्यालयांतर्गत ९, धानोरा उपप्रादेशिक कार्यालयांतर्गत ९ व घोट उपप्रादेशिक कार्यालयांतर्गत १० असे एकूण ५१ खरेदी केंद्र गडचिरोली प्रादेशिक कार्यालयाच्या नियंत्रणात सुरू आहेत. या ५१ धान खरेदी केंद्रावरून आतापर्यंत ८२ कोटी ६ लाख ४५ हजार रुपये किमतीच्या ४ लाख ६८ हजार ९४० क्विंटल इतक्या धानाची खरेदी झाली आहे.
अहेरी उपप्रादेशिक कार्यालयांतर्गत ३५ केंद्रांवरून आतापर्यंत ३० कोटी २० लाख ५० हजार ५६० रूपये किमतीच्या १ लाख ७२ हजार ६०० क्विंटल इतक्या धानाची खरेदी झाली आहे. विशेष म्हणजे, महामंडळाच्या वतीने आविका संस्थांच्या केंद्रांवर साधारण प्रतीच्या धानाची खरेदी करण्यात आली आहे. डिसेंबर महिन्यात काही दिवस जिल्ह्यातील बºयाच केंद्रांवर बारदान्याचा तुटवडा होता.
त्यामुळे महामंडळाची धान खरेदी प्रभावित झाली होती. मात्र त्यानंतर महामंडळाने कार्यवाही करून बारदान्याचा प्रश्न मार्गी लावला. त्यामुळे धान खरेदी पूर्ववत सुरळीत झाली.
६२ कोटी ३८ लाखांचे धान चुकारे पेंडिंग
आदिवासी विकास महामंडळाच्या वतीने धान चुकाºयाची रक्कम संबंधित शेतकºयांच्या थेट बँक खात्यात वळती केली जाते. मात्र त्यापूर्वी आविका संस्थांकडून प्राप्त झालेल्या हुंड्या, सातबारे व बँक खात्याची पडताळणी केली जाते. आविका संस्थांकडून महामंडळाच्या कार्यालयाला या सर्व आवश्यक बाबी प्राप्त होण्यासाठी विलंब होतो. त्यामुळे धान चुकाºयाची रक्कम अदा करण्यासाठी महामंडळाकडून वेळ लागत असते. अद्यापही ६२ कोटी ३८ लाख २६ हजार १९२ रुपये इतकी धान चुकाºयाची रक्कम महामंडळाकडे प्रलंबित आहे. त्यामुळे धानाची विक्री करूनही जिल्ह्यातील हजारो शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. गडचिरोली प्रादेशिक कार्यालयांतर्गत विविध केंद्रांवर धानाची विक्री केलेल्या शेतकºयांचे ४१ कोटी ७२ लाख व अहेरी कार्यालयांतर्गत २० कोटी ६५ लाख रूपयांचे धान चुकारे प्रलंबित असल्याची माहिती महामंडळाच्या सूत्रांकडून मिळाली आहे.
८० हजार क्विंटल धानाची उचल
गडचिरोली व अहेरी दोन्ही कार्यालय मिळून आतापर्यंत एकूण ६ लाख ४१ हजार ५४० क्विंटल धानाची खरेदी झाली आहे. महामंडळाने धान भरडाईसाठी ३८ राईसमिलला मान्यता प्रदान केली आहे. संबंधित मिलकडे १ लाख २१ हजार ५१५ क्विंटल धान देण्यात आले असून अभिकर्ता संस्थेकडे ५ लाख २० हजार क्विंटल धान शिल्लक आहेत. मिलर्सकडून संबंधित केंद्रावरून आतापर्यंत जवळपास ८० हजार ९२४ क्विंटल धानाची उचल झाली आहे. भरडाईचे काम १२.६१ टक्क्यावर पोहोचले आहे.