दिवाळीपूर्वी धान खरेदी सुरू हाेणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2020 05:00 AM2020-10-29T05:00:00+5:302020-10-29T05:00:13+5:30
शेतकऱ्यांची अडचण हाेऊ नये, यासाठी आदिवासी विकास महामंडळाची यंत्रणा कामाला लागली असून आविका संस्थांच्या धान खरेदी केंद्राला ३ ते ४ नाेव्हेंबरपर्यंत मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. मंजुरी मिळाल्यानंतर साधारणता १० नाेव्हेंबरपासून खरीप हंगामातील धान खरेदी केंद्र सुरू हाेणार आहेत. आदिवासी विकास महामंडळाच्या वतीने गडचिराेली जिल्ह्यात दरवर्षी खरीप व रबी अशा दाेन्ही हंगामात धानाची माेठ्या प्रमाणात खरेदी केली जाते.
दिलीप दहेलकर ।
लाेकमत न्यूज नेटवर्क
गडचिराेली : आदिवासी विकास महामंडळांतर्गत आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या वतीने यंदा सन २०२०-२१ या खरीप हंगामात आधारभूत धान खरेदी केंद्र सुरू करण्यासाठी प्रशासनाच्या हालचाली वाढल्या आहेत. महामंडळाच्या गडचिराेली प्रादेशिक कार्यालयांतर्गत आत्तापर्यंत ३२ संस्थांचे धान खरेदी करण्याबाबतचे प्रस्ताव ठरावासह महामंडळाच्या कार्यालयाला प्राप्त झाले आहेत. पुढील कार्यवाही गतीने सुरू असून जिल्ह्यात दिवाळीपूर्वीच आधारभूत धान खरेदी केंद्र सुरू हाेणार आहेत.
शेतकऱ्यांची अडचण हाेऊ नये, यासाठी आदिवासी विकास महामंडळाची यंत्रणा कामाला लागली असून आविका संस्थांच्या धान खरेदी केंद्राला ३ ते ४ नाेव्हेंबरपर्यंत मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. मंजुरी मिळाल्यानंतर साधारणता १० नाेव्हेंबरपासून खरीप हंगामातील धान खरेदी केंद्र सुरू हाेणार आहेत. आदिवासी विकास महामंडळाच्या वतीने गडचिराेली जिल्ह्यात दरवर्षी खरीप व रबी अशा दाेन्ही हंगामात धानाची माेठ्या प्रमाणात खरेदी केली जाते.
गडचिराेली हा धान उत्पादक शेतकऱ्यांचा जिल्हा आहे. जिल्ह्यात धानाची शेती माेठ्या प्रमाणात केली जाते. जवळपास दीड लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर दरवर्षी खरीप हंगामात धान पिकाची लागवड केली जाते. यावर्षीसुद्धा शेतकऱ्यांनी कमी व जास्त मुदतीच्या जड, मध्यम व हलक्या प्रतीच्या धानाची लागवड केली आहे. सध्यास्थितीत कमी मुदतीच्या धान पिकाची कापणी व बांधणीचे काम सुरू आहे. काही शेतकरी हलक्या धानाची मळणी करण्याच्या तयारीत आहेत. दरम्यान आर्थिक अडचणीत सापडलेले शेतकरी लगबगीने मळणी करून धान व्यापाऱ्यांना विकण्यासाठी पुढे येतात. उसणवारचे देणे व कर्जफेड करण्यासाठी शेतकरी मिळेल त्या भावाने धान विकून आपले काम भागवून घेतात. अशास्थितीत खासगी व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची लूट हाेते. ही लूट थांबवून शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी शासनाने हमीभाव आधारभूत धान खरेदी याेजना सुरू केली आहे. या याेजनेची अंमलबजावणी आदिवासी विकास महामंडळ व मार्केटिंग फेडरेशनच्या वतीने जिल्ह्यात केली जाते.
आदिवासी विकास महामंडळाच्या गडचिराेली प्रादेशिक कार्यालयांतर्गत एकूण ५४ आविका संस्था आहेत. यापैकी आत्तापर्यंत ३२ संस्थांनी यावर्षीच्या खरीप हंगामात धानाची खरेदी करण्यासाठीचा ठराव घेऊन तसा प्रस्ताव महामंडळाच्या प्रादेशिक कार्यालयाकडे सादर केले आहे. यामध्ये कुरखेडा उपप्रादेशिक कार्यालयांतर्गत १०, काेरची ९, आरमाेरी ६ व धानाेरा उपप्रादेशिक कार्यालयाच्या हद्दीतील ७ आविका संस्थांचा समावेश आहे. उर्वरित संस्थांचे प्रस्ताव येणे शिल्लक आहे. या आविका संस्था संचालक मंडळाची बैठक घेऊन धान खरेदीचा ठराव येत्या काही दिवसात घेणार आहेत. घाेट उपप्रादेशिक कार्यालयांतर्गत चार आविका संस्थांचे प्रस्ताव लवकरच प्राप्त हाेणार आहेत, अशी माहिती गडचिराेली कार्यालयाच्या सुत्रांकडून मिळाली आहे. आविका संस्थांचे ठराव व प्रस्तावाची छाननी करून सर्व संस्थाचे एकत्रित प्रस्ताव जिल्हा पुरवठा अधिकारी व जिल्हाधिकारी गडचिराेली यांच्याकडे महामंडळ कार्यालयाच्या वतीने सादर करण्यात येणार आहे.
अहेरी उपविभागात राहणार ३९ केंद्र
महामंडळाच्या अहेरी उपप्रादेशिक कार्यालयांतर्गत गतवर्षीच्या खरीप हंगामात ३७ धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आले हाेते. यावर्षीच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांच्या मागणीची दखल घेऊन हेडरी व पेंटिपाका येथे नवीन धान खरेदी केंद्र देण्यात येणार आहे. जुने व नवीन मिळून यावर्षी ३९ केंद्रांवरून पाच तालुक्यात धानाची खरेदी करण्यात येणार आहे.