भामरागड, कोठीतील धान खरेदी केंद्र बंद

By admin | Published: March 12, 2017 02:00 AM2017-03-12T02:00:38+5:302017-03-12T02:00:38+5:30

आदिवासी विकास महामंडळांतर्गत आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थामार्फत भामरागड तालुक्यात कोठी, मन्नेराजाराम, आरेवाडा,

Paddy purchase center in Bhamragarh, Kothi closed | भामरागड, कोठीतील धान खरेदी केंद्र बंद

भामरागड, कोठीतील धान खरेदी केंद्र बंद

Next

गोदामाचा अभाव : महिनाभरापासून अनेक शेतकरी त्रस्त
भामरागड : आदिवासी विकास महामंडळांतर्गत आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थामार्फत भामरागड तालुक्यात कोठी, मन्नेराजाराम, आरेवाडा, लाहेरी व भामरागड या ठिकाणी धान खरेदी केंद्र मंजूर करण्यात आले. खरेदी केलेल्या धान साठवणुकीने कोठी व भामरागड केंद्रातील गोदाम फुल्ल झाले आहेत. आता धान साठवणुकीची व्यवस्था नसल्याने महिनाभरापासून या दोन्ही केंद्रावरील धान खरेदीची प्रक्रिया पूर्णत: ठप्प पडली आहे. परिणामी धान खरेदीअभावी तालुक्यातील शेतकरी प्रचंड अडचणीत सापडले आहेत.
भामरागड येथील धान खरेदी केंद्र सहकारी संस्थेच्या वतीने १५ डिसेंबर २०१६ पासून सुरू करण्यात आले. सदर केंद्रावर ३ हजार ५७२ पोते धान खरेदी करण्यात आली. सन २०१४-१५ या वर्षातील खरेदी केलेले काही धान्य गोदाममध्ये ठेवण्यात आले होते. सदर धानाची वेळेत उचल न झाल्याने हे धान्य गोदामात ठेवण्यात आले. आता केंद्रांवरील गोदाम धानाने फुल्ल झाल्याने धान खरेदी बंद करण्यात आली. महिनाभरानंतर २०१४-१५ च्या हंगामात खरेदी केलेल्या जुन्या धानाची उचल करण्यात आली. त्यानंतर पुन्हा ८ मार्च २०१७ पासून येथे धान खरेदीची प्रक्रिया सुरू झाली. केंद्र सुरू झाल्याची माहिती कळताच भामरागड परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी या केंद्रांवर विक्रीसाठी धान आणले. मात्र धान साठवणुकीसाठी जागाच शिल्लक नसल्याने हजार पोत्यापेक्षा अधिक धानाची खरेदी होणार नाही, अशी माहिती केंद्र संचालकांकडून शेतकऱ्यांना देण्यात आली. तेव्हापासून या केंद्रावर धान खरेदीची प्रक्रिया पूर्णत: ठप्प आहे. परिणामी शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणलेले धान केंद्राच्या परिसरात उघड्यावर तसेच पडून आहेत. सदर धान खरेदी केंद्रावर १ हजार ४७० रूपये अधिक २०० रूपये बोनस असे एकूण १ हजार ६७० रूपये भाव प्रती क्विंटल आहे. दुसरीकडे खासगी व्यापारी ११०० ते १२०० रूपये प्रती क्विंटल या भावाने धान खरेदी करीत आहेत. आदिवासी महामंडळाच्या केंद्रावर धानाला खासगी व्यापाऱ्यापेक्षा अधिक भाव आहे. मात्र महामंडळाचे धान खरेदी केंद्र साठवणुकीच्या व्यवस्थेअभावी बंद असल्याने नाईलाजास्तव शेतकऱ्यांना खासगी व्यापाऱ्याकडे जाऊन कवडीमोल भावात धान विकावा लागत आहे. या सर्व प्रकारामुळे भामरागड व कोठी परिसरातील शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक होत आहे. एकीकडे शासन व प्रशासन शेतकऱ्यांचे उत्पादन वाढविण्यासाठी विविध योजनांची अंमलबजावणी करते, मात्र दुसरीकडे धान साठवणुकीअभावी खरेदीची प्रक्रिया रखडली असतानाही दखल घेतली जात नाही, अशी नाराजी या भागातील शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. शेतकऱ्यांच्या या गंभीर प्रश्नाकडे लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केले आहे. (तालुका प्रतिनिधी)

उघड्यावरील धानाची शेतकरीच करतात देखभाल
भामरागड केंद्रावरील गोदाम धानाने फुल्ल झाल्याने आता धान साठवणुकीसाठी जागा नाही. भामरागडच्या केंद्र परिसरात शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणलेले धान उघड्यावर ठेवण्यात आले आहे. सदर धानाचा काटा न झाल्याने आदिवासी विकास महामंडळ तसेच सहकारी संस्थेचे केंद्रावरील कर्मचारी उघड्यावरील धानाची देखभाल करीत नाही. परिणामी ज्यांच्या मालकीचे धान उघड्यावर ठेवण्यात आले आहे. ते शेतकरी गेल्या तीन दिवसांपासून रात्रीच्या सुमारास मुक्कामी राहून स्वत:च्या धानाची देखभाल करीत आहेत. प्रसंगी शेतकऱ्यांना येथे उपाशीही राहावे लागत आहे. आपले दैनंदिन कामकाज सोडून धानाच्या रखवालीसाठी अनेक शेतकऱ्यांना केंद्राच्या परिसरात मुक्काम ठोकावा लागत आहे. गोदाम नसल्याने शेतकऱ्यांवर ही पाळी आली आहे. मात्र याकडे आदिवासी विकास महामंडळाच्या अहेरी उपप्रादेशिक कार्यालयातील अधिकाऱ्यांचे प्रचंड दुर्लक्ष होत आहे.

 

Web Title: Paddy purchase center in Bhamragarh, Kothi closed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.