बारदाण्याअभावी धान खरेदी रखडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2018 12:06 AM2018-12-12T00:06:42+5:302018-12-12T00:08:18+5:30
महाराष्ट्र राज्य आदिवासी विकास महामंडळामार्फत धानोरा तालुक्यात धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहेत. मात्र धान खरेदी केंद्रांवर मागील काही दिवसांपासून बारदानाचा तुटवडा असल्याने धान खरेदी रखडली आहे. परिणामी हजारो क्विंटल धान खरेदी केंद्रावर पडून आहेत.
घनश्याम म्हशाखेत्री ।
लोकमत न्यूज नेटवर्क
धानोरा : महाराष्ट्र राज्य आदिवासी विकास महामंडळामार्फत धानोरा तालुक्यात धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहेत. मात्र धान खरेदी केंद्रांवर मागील काही दिवसांपासून बारदानाचा तुटवडा असल्याने धान खरेदी रखडली आहे. परिणामी हजारो क्विंटल धान खरेदी केंद्रावर पडून आहेत.
शेवटच्या टप्प्यात पावसाने दगा दिल्यानंतर शेतकऱ्यांनी कृषिपंप, डिझेल इंजिन लावून धानाची शेती पिकविली. यामुळे उत्पादन खर्चात वाढ झाली असली तरी अपेक्षित उत्पन्न झाले नाही. धानाच्या लागवडीसाठी केलेल्या खर्चाची परतफेड करण्याकरिता शेतकरी धान खरेदी केंद्रावर धान आणून ठेवत आहेत. ‘अ’ प्रतीच्या धानाला १७७० रूपये व ‘क’ प्रतीच्या धानाला १७५० रूपये भाव दिला जात आहे. धानोरा तालुक्यात आदिवासी विकास कार्यकारी सहकारी संस्था धानोरा, मुरूमगाव, रांगी, दुधमाळा व कारवाफा येथे धान खरेदी केंद्र सुरू झाले आहेत. मात्र सोडे, मोहली, पेंढरी, गट्टा, सुरसुंडी, सावरगाव, येरकड येथील धान खरेदी केंद्र अजूनही सुरू झाले नाही. त्यामुळे या भागातील शेतकºयांना खासगी व्यापाºयांना धान विकावे लागत आहे.
धानोरा येथील धान खरेदी केंद्राला भेट दिली असता, खरेदी केंद्रावर हजारो क्विंटल धान उघड्यावर पडून असल्याचे दिसून येत आहे. बारदाना नसल्याने काही शेतकºयांचे धान खरेदी करण्यास अडचण निर्माण होत आहे. मागील दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. काही ठिकाणी पावसानेही हजेरी लावली आहे. पावसाने धान भिजू नये, यासाठी शेतकऱ्यांनी स्वत:ची ताडपत्री झाकून ठेवली आहे.
यावर्षी धानोरा केंद्रावर फक्त पाच हजार बारदाना उपलब्ध करून देण्यात आला होता. हा बारदाना काही दिवसांतच संपला. तेव्हापासून ज्या शेतकऱ्यांनी स्वत:चा बारदाना आणला आहे, अशाच शेतकºयांचे धान खरेदी केले जात आहे.
बाजारात एका बारदान्याची किंमत २० ते २५ रूपये आहे. मात्र शासन केवळ १५ रूपये देत आहे. त्यातही प्रती बारदाना १० रूपये नुकसान शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे. धानोरा तालुक्यात सर्वत्र हीच परिस्थिती आहे.
९ हजार क्विंटल खरेदी
तालुक्यातील पाचही केंद्रांवर ९ हजार २०७ क्विंटल धान खरेदी करण्यात आले आहे. मात्र एकाही शेतकऱ्याला धानाचे चुकारे देण्यात आले नाही. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. खरेदी केंद्रावर वेळेवर चुकारा होत नसल्याने काही धानोरा तालुक्यातील शेतकरी खासगी व्यापाºयांना धान विकत असल्याचे दिसून येत आहे.
धानोरा तालुक्यातील धान खरेदी केंद्रांकरिता एक लाख बारदान्याची मागणी केली आहे. दोन ते तीन दिवसांत बारदाना उपलब्ध होईल. तसेच बारदान्यासाठी पाच रूपये वाढीचा प्रस्ताव पाठविला आहे. आॅनलाईनची कामे पूर्ण झाले नसल्याने शेतकऱ्यांचे धानाचे चुकारे देण्यास उशीर होत आहे. ते लवकर देण्यात येतील.
- डी.एस.चौधरी, उपव्यवस्थापक, उपप्रादेशिक कार्यालय, धानोरा