पारडी कुपीतील धान खरेदी केंद्र २० दिवसांपासून बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2021 04:36 AM2021-02-16T04:36:57+5:302021-02-16T04:36:57+5:30
गडचिराेली : तालुक्यातील पारडी कुपी येथील आधारभूत धान खरेदी केंद्र सुरू झाल्यानंतर केवळ १५ दिवस खरेदी करण्यात आली. त्यानंतर ...
गडचिराेली : तालुक्यातील पारडी कुपी येथील आधारभूत धान खरेदी केंद्र सुरू झाल्यानंतर केवळ १५ दिवस खरेदी करण्यात आली. त्यानंतर गुदाम भरल्याचे कारण सांगून खरेदी बंद करण्यात आली. पारडीसह परिसरातील अनेक गावांतील शेतकऱ्यांनी अद्यापही धानाची विक्री केली नाही. त्यामुळे लवकर खरेदी केंद्र सुरू करावीत, अशी मागणी गावातील नागरिकांनी मार्केटिंग फेडरेशनचे जिल्हा व्यवस्थापक विश्वनाथ तिवाडे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
पारडी कुपी येथे मार्केटिंग फेडरेशन अंतर्गत खरेदी-विक्री संस्थेच्या वतीने धान खरेदी केली जात आहे. यावर्षी उशिरा धान खरेदीला सुरुवात झाली. अनेक शेतकऱ्यांनी केंद्रावर धानाची विक्री केली. परंतु जेमतेम १५ दिवस खरेदी केंद्र सुरू हाेते. येथील गुदाम पूर्ण भरल्याने धान खरेदी बंद करण्यात आली. अनेक शेतकऱ्यांनी अद्यापही धानाची विक्री केली नाही. या हंगामातील धान खरेदी बंद हाेण्यासाठी केवळ दीड महिन्याचा कालावधी शिल्लक आहे. अशा स्थितीत शेतकरी धान विक्रीपासून वंचित राहण्याचा धाेका नाकारता येत नाही. आधीच आर्थिक संकटात असलेल्या शेतकऱ्यांना पैशाची टंचाई जाणवत आहे. त्यातच खरेदी केंद्र बंद झाल्याने धान विक्रीसाठी कुठे न्यावे, असा प्रश्न त्यांना पडला आहे. परिसरातील जवळपास २००पेक्षा अधिक शेतकरी धान विक्रीपासून वंचित राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे पारडीतील आधारभूत धान खरेदी केंद्र पूर्ववत सुरू करावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी व्यवस्थापक तिवाडे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनाही निवेदन देण्यात आले आहे. व्यवस्थापकांना निवेदन देताना आनंद नागाेसे, विकेश भजभुजे, तानाजी मुरतेली, नेताजी लाेंढे, गिरीधर मुरतेली, चंद्रशेख मुरतेली उपस्थित हाेते. निवेदनावर ४७ शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.