पावसाअभावी धानपीक करपले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2018 01:29 AM2018-10-07T01:29:58+5:302018-10-07T01:30:23+5:30
तोंडाजवळ आलेला हातातला घास कुणी हिसकावून न्यावा, अगदी तशीच अवस्था जिल्ह्यातील गावांमध्ये झाली आहे. देसाईगंज तालुक्यातील विहीरगाव परिसरातील अनेक शेतकऱ्यांचे जड व मध्यम प्रतीचे धानपीक पाण्याअभावी करपण्याच्या स्थितीत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
विसोरा : तोंडाजवळ आलेला हातातला घास कुणी हिसकावून न्यावा, अगदी तशीच अवस्था जिल्ह्यातील गावांमध्ये झाली आहे. देसाईगंज तालुक्यातील विहीरगाव परिसरातील अनेक शेतकऱ्यांचे जड व मध्यम प्रतीचे धानपीक पाण्याअभावी करपण्याच्या स्थितीत आहे. त्यामुळे शेतकरी चिंतातूर आहे.
सप्टेंबर महिन्याच्या २० तारखेला पाऊस झाला. हा दिवस वगळता संपूर्ण म्हिना कोरडा गेला. त्यामुळे येथील शेतातल्या धानाला सिंचन सुविधा होऊ शकली नाही परिणामी धान करपले. धान करपल्याने बळीराजा नि:शब्द असून सरकारने मदत देण्याची मागणी विहीरगावच्या शेतकऱ्यांकडून होत आहे.
खरीप हंगामाची चाहूल लागताच शेतकरी बांधव धानपिकाची रास येईपर्यंतच्या संपूर्ण खर्चाचा हिशोब करून आधीच जुळवाजुळव करण्याचा जिवतोड प्रयत्न करतो. त्यासाठी मागील हंगामातील धान विकणे, रब्बी पीक विकणे, बँकेचे कर्ज अशा पद्धतीने पैसे उभारून पेरणी पूर्व मशागत, सेंद्रिय खत टाकणे, नांगरणी, बी-बियाणे खरेदी, पेरणी, रासायनिक खत टाकणे, चिखलणी, मजुरांची तजवीज, रोवणी, पुन्हा कीटकनाशक फवारणी, निंदण करीत असतो. या दरम्यान पाऊस नसल्यास पाण्यासाठी कृषिपंप, डिझेल इंजिनची व्यवस्था करणे, कापणी, बांधणी, मळणी यंत्र शोधून मळणी करणे आणि अखेर धान रास घरी आणणे.
यासर्व प्रक्रियेतून गेल्यावर धानपीक हातात येते. मात्र या टप्प्यात पावसाने दडी मारल्यास, अतिवृष्टीने बुडाल्यास, रोगाने पीक नष्ट झाल्यास धानावर केलेला हजारो रुपयांचा खर्च तोट्यात जातो. अगदी हीच परिस्थिती तालुक्यातील पूर्वेकडील विहीरगाव व परिसरात दिूसन येत आहे. आॅगस्ट महिन्याच्या शेवटपर्यंत पावसाने योग्य साथ दिली. त्यामुळे धान जोमात होता परंतु पूर्ण सप्टेंबर महिन्यात २० तारखेचा उत्तरा नक्षत्राचा पाऊस वगळल्यास सप्टेंबर महिना पावसाविना गेला. याचा प्रतिकूल परिणाम धानावर झाला.
देसाईगंज तालुक्यातील अनेक गावांमध्ये शेतकऱ्यांच्या शेतात सिंचन सुविधा न होऊ शकल्याने हजारो रुपये खर्चून जपलेले धानपीक डोळ्यादेखत करपल्याने बळीराजा चिंतातूर झाला आहे. झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून शासनाने नुकसानभरपाई द्यावी, अशी विहीरगावच्या शेतकऱ्यांनी केली आहे.