पानटपऱ्यांवरून पान झाले गायब!
By admin | Published: March 30, 2015 01:23 AM2015-03-30T01:23:29+5:302015-03-30T01:23:29+5:30
‘डॉन’ या चित्रपटात खईके पान बनारसवाला हे प्रसिध्द गाणे केवळ पानावर तयार करण्यात आले होते.
गडचिरोली : ‘डॉन’ या चित्रपटात खईके पान बनारसवाला हे प्रसिध्द गाणे केवळ पानावर तयार करण्यात आले होते. जुन्या पिढीतील अनेक लोक पान आवडीने खात होते. त्यामुळे पान विक्रीचा व्यवसायही मोठ्या प्रमाणावर व्हायचा. कालांतराने समाजात अनेक बदल घडत आले. ज्या पानटपऱ्यांवर पानाची पूर्वी मोठ्या प्रमाणावर विक्री व्हायची, त्या पानटपऱ्या आता केवळ खर्रे घोटण्याचे केंद्र झाले आहे. पानटपरीवरून ग्राहक नसल्याने पान तयार करण्याचे काम बंद झाले आहे. गडचिरोली शहरात ५०० वर पानठेले आहेत. तर जिल्ह्यात १० हजारावर पानटपऱ्या आहेत. यातील ७५ टक्के पानटपऱ्यांवर आता पानाची विक्रीच केली जात नाही. केवळ खर्रे घोटण्यासाठी सुपारी व आदी साहित्य ठेवले जाते. काही पानटपरी चालकांनी तर खर्रा घोटण्याच्या मशिन ठेवलेल्या आहेत. दिवसभर पाच ते सात किलो सुपारीचा खर्रा तयार करून ठेवला जातो. २० रूपयाला एक पुडी खर्रा विकला जातो. त्यामुळे पानठेल्यांवरून बंगला, बनारसी पान बंद झाले आहे. गडचिरोली शहरात खुल्या पानांची विक्री करणारे बारी समाजाचे अनेक नागरिक आहेत. परंतु त्यांचाही हा पांरपारिक व्यवसाय आता जुन्यासारखा राहिला नाही. काही पानठेल्यांवर १० रूपयाला एक पान विकल्या जाते. परंतु त्यांचा ग्राहक हा ठराविकच आहे. (जिल्हा प्रतिनिधी)