पंचायत राज समिती जिल्ह्यात हाेणार दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2021 04:34 AM2021-03-06T04:34:56+5:302021-03-06T04:34:56+5:30
गडचिराेली : शासनाच्या विविध याेजनांची कितपत अंमलबजावणी झाली, याेजनांच्या माध्यमातून सामान्यांचा विकास झाला काय, प्राप्त निधीचे याेग्य विनियाेजन झाले ...
गडचिराेली : शासनाच्या विविध याेजनांची कितपत अंमलबजावणी झाली, याेजनांच्या माध्यमातून सामान्यांचा विकास झाला काय, प्राप्त निधीचे याेग्य विनियाेजन झाले काय? हे सर्व तपासून त्याचा आढावा घेण्यासाठी महाराष्ट्र विधान मंडळाच्या पंचायत राज समितीचा दाैरा गडचिराेली जिल्ह्यात हाेणार आहे. त्या अनुषंगाने मागील प्रश्नावलीच्या आधारे माहिती संकलित करण्याच्या कामास वेग आला असून जिल्हा परिषदेचे अधिकारी व कर्मचारी या कामात व्यस्त झाले आहेत. असे असले तरी पंचायत राज या समितीच्या दाैऱ्यावर ‘काेराेना’चे सावट दिसून येत आहे.
पंचायत राज समितीच्या दाैऱ्यासंदर्भात महाराष्ट्र विधान मंडळ सचिवालयाच्या उपसचिवांनी आदेश काढले असून यासंदर्भातील आदेशाची प्रत जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी यांना प्राप्त झाले आहे. काेविड संसर्गाच्या प्रादुर्भावाचा प्रसार विचारात घेऊन समितीच्या भेटीचा व बैठकीचा कालावधी निश्चित करण्यात येईल, असे आदेशात म्हटले आहे.
सध्या काेराेना संसर्गाचा दुसरा टप्पा सुरू झाला आहे. गडचिराेली जिल्ह्यातही काेराेनाबाधित रुग्णांची संख्या हळूहळू वाढत आहे. त्यामुळे मार्च महिन्यात पंचायत राज समितीचा दाैरा हाेणार नाही. मात्र, एप्रिल व मे २०२१ या कालावधीत ही समिती गडचिराेली जिल्हा परिषदेला भेट देऊन बैठकांमधून विविध याेजनांचा आढावा घेणार आहे, असे उपसचिवांच्या आदेशात नमूद आहे. त्या अनुषंगाने जिल्हा परिषदेचे सर्व विभाग सतर्क झाले असून शासनाचा निधी, त्यावरील खर्च व याेजनांची अंमलबजावणी आदींबाबतची माहिती पंचायत समिती व ग्रामपंचायत प्रशासनाकडून मागितली जात आहे.
बाॅक्स ....
दाेन वर्षांपूर्वी समिती झाली हाेती दाखल
सन २०१७-१८ मध्ये राज्याची पंचायत राज समिती गडचिराेली जिल्हा परिषदेत दाखल झाली हाेती. त्यावेळी या समितीत आमदारांपासून ते सचिवस्तरावरील अधिकारी सहभागी झाले. या समितीत २० ते २५ जणांचा समावेश असताे. आता एप्रिल किंवा मे महिन्यात येणाऱ्या या समितीत राज्याच्या विविध भागांतील आमदारांचा समावेश आहे.
बाॅक्स ......
काेराेनाच्या दुसऱ्या टप्प्यापूर्वी अनेक जिल्ह्यांना भेटी
मार्च २०२० पासून नऊ महिने काेराेना महामारीने विदर्भासह संपूर्ण राज्यात थैमान घातले हाेते. दरम्यान राज्य सरकारच्या विविध समित्यांच्या दाैऱ्यांना तसेच आढावा बैठकांना पूर्णता ब्रेक लागला. काेराेना संसर्गात आटाेक्यात येऊन पहिला टप्पा डिसेंबरअखेर संपला. दरम्यान जानेवारीत अनलाॅक करण्यात आले. या महिन्यात पंचायत राज समितीने चंद्रपूर, यवतमाळ जिल्ह्यासह विविध जिल्ह्यांत दाैरे करून आढावा घेतला.