पंचायत समितीचे कर्मचारी वेतनाच्या प्रतीक्षेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 04:37 AM2021-05-10T04:37:17+5:302021-05-10T04:37:17+5:30
जिल्हा परिषदअंतर्गत येत असलेल्या बारा पंचायत समितीमध्ये कार्यरत ग्रामीण पाणीपुरवठा यांत्रिकी विभागातील शेकडो कर्मचाऱ्यांचे मार्च व एप्रिल २०२१ या ...
जिल्हा परिषदअंतर्गत येत असलेल्या बारा पंचायत समितीमध्ये कार्यरत ग्रामीण पाणीपुरवठा यांत्रिकी विभागातील शेकडो कर्मचाऱ्यांचे मार्च व एप्रिल २०२१ या दोन महिन्याचे वेतन अद्याप झाले नसून, मे महिन्याची आज ९ तारीख आली असून काही दिवसात महिना संपण्याच्या उंबरठ्यावर राहील तेव्हा दोन-तीन महिने आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा, या विवंचनेत कर्मचारी आहेत.
कोरोना काळात सामान्य माणूस हतबल झाला असून, त्यात वेतन झाले नाही तर त्या कर्मचाऱ्याची मानसिकता कशी असेल, याची कल्पनाच न केलेली बरी. त्यातच मुलाबाळांचे शिक्षण, औषधोपचार, त्यांनी विविध कामासाठी घेतलेल्या कर्जाचे हप्ते कसे भरणार? आदी ज्वलंत समस्या कशा पद्धतीने सोडवायच्या, या विवंचनेत कर्मचारी आहेत. मात्र या समस्यांकडे जिल्हा परिषदेचा संबधित विभाग कानाडोळा करीत असल्यानेच वेतन रखडले असल्याची भावना कर्मचाऱ्यात आहे. याबाबत जिल्हा परिषद प्रशासनाने मंथन करण्याची गरज आहे.