नक्षल बॅनरऐवजी दिसताहेत नक्षलविरोधी घोषणांचे फलक
By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2018 06:26 PM2018-07-26T18:26:01+5:302018-07-26T18:26:27+5:30
२८ जुलै ते ३ आॅगस्टदरम्यान नक्षलवाद्यांकडून पाळल्या जात असलेल्या शहीद सप्ताहाचा नागरिकांकडून उघड विरोध होताना दिसत आहे.
गडचिरोली : येत्या २८ जुलै ते ३ आॅगस्टदरम्यान नक्षलवाद्यांकडून पाळल्या जात असलेल्या शहीद सप्ताहाचा नागरिकांकडून उघड विरोध होताना दिसत आहे. सप्ताह सुरू होण्यापूर्वी दिसणारे नक्षलींचे बॅनर यावेळी दिसेनासे झाले असून, काही ठिकाणी नक्षलींच्या बॅनरऐवजी नक्षलविरोधी घोषणा देऊन नागरिक आपल्या भावना व्यक्त करीत आहेत.
गेल्या जवळपास चार दशकांपासून नक्षली कारवायांमुळे दहशतीत असलेल्या जिल्ह्यातील नागरिकांची हिंमत अलिकडे थोडी वाढली आहे. त्यामुळे नक्षलींचा जाहीरपणे निषेध करण्यासाठी काही ठिकाणचे लोक समोर येत आहेत. यातूनच बुधवारी पेंढरी परिसरातील लोकांनी नक्षलवाद्यांचा निषेध करत पेंढरी ते चातगाव मार्गावर असलेल्या दिशादर्शक सूचना फलकावर नक्षलविरोधी घोषणा रंगवून आपल्या भावना व्यक्त केल्या.
सध्या पेंढरी ते चातगाव रस्त्याची अवस्था अत्यंत खराब झाली आहे. या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम मंजूर असताना नक्षलींच्या भीतीने कंत्राटदार रस्ता बांधकाम करण्यास घाबरत आहेत. त्यांची भीती दूर व्हावी आणि पेंढरी परिसरातील गावांचा विकास व्हावा, अशी नागरिकांची अपेक्षा आहे. त्यांच्या जनजागृती करण्यासाठी पेंढरे उपपोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पो. उपनिरीक्षक गोविंद खैरे व त्यांचे सहकारी परिश्रम घेत आहेत.
नक्षलींकडून विकासाला विरोध?
रस्ता किंवा पूल बांधकाम करण्यासाठी गेलेल्या कंत्राटदाराच्या वाहनांची जाळपाळ करून नक्षलवादी त्यांचे नुकसान करतात. त्यामुळे नक्षलवादी गोरगरीब आदिवासी लोकांच्या विकासात अडथळा निर्माण करत असल्याचे लक्षात आल्याने नागरिकांकडून नक्षलींना विरोध होत आहे. नक्षलींचे वरिष्ठ तेलगू नेते खंडणी वसुली करून आपल्या कुटुंबावर खर्च करतात, पण सामान्य आदिवासींच्या विकासासाठी व सोयीसुविधांसाठी ते काय करतात? असा सवाल लोक करीत आहेत.