नक्षल्यांच्या हिंसक घटनांनी दहशत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2019 10:16 PM2019-05-19T22:16:09+5:302019-05-19T22:16:28+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : मागील एक महिन्यापासून नक्षलवाद्यांनी विविध हिंसक घटना घडविल्या आहेत. त्यामुळे दुर्गम भागात दहशतीचे वातावरण ...
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : मागील एक महिन्यापासून नक्षलवाद्यांनी विविध हिंसक घटना घडविल्या आहेत. त्यामुळे दुर्गम भागात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तेंदूपत्त्याच्या हंगामावरही नक्षल्यांच्या दहशतीचा परिणाम झाला आहे.
महाराष्ट्र दिनाच्या रात्री नक्षलवाद्यांनी कुरखेडा तालुक्यातील दादापूर येथील डांबर प्लान्टवरील २७ वाहनांना आग लावली. या घटनेचा पंचनामा करण्यासाठी गेलेल्या १५ पोलीस व एक वाहन चालकालाही लक्ष्य करण्यात नक्षलवादी यशस्वी झाले. या घटनानंतर नक्षलवाद्यांच्या हिंसक कारवायांमध्ये प्रचंड प्रमाणात वाढ झाली आहे. एटापल्ली, भामरागड तालुक्यात ठिकठिकाणी बॅनर बांधून तसेच नक्षलपत्रके टाकून सरकार व पोलिसांवर टिका केली आहे. पोलिसांच्या आक्रमक पवित्र्यामुळे नक्षलवादी चळवळीला मोठा हादरा बसल्याचा अंदाज यायला लागला असतानाच नक्षलवादी पुन्हा आक्रमक झाले आहेत.
१९ मे रोजी नक्षलवाद्यांनी बदंचे आवाहन केले होते. सदर बंद यशस्वीकरण्यासाठी नक्षलवाद्यांनी कुरखेडा तालुक्यातील कुरंडी रिठ व चिपरी तसेच एटापल्ली तालुक्यातील गुरूपल्ली येथील लाकूड बिटांना आग लावली. या दोन्ही ठिकाणी नक्षल बॅनर बांधले. बंदच्या दिवशी तेंदूपत्ता संकलन न करण्याचे आवाहन केले होते. नक्षल्यांच्या दहशतीने घाबरलेल्या ग्रामस्थांनी १९ मे रोजी तेंदूपत्त्याचे संकलन सुध्दा बंद ठेवले.
तेंदूपत्ता संकलनासाठी ग्रामीण भागातील नागरिक दुर्गम भागात जातात. मात्र नक्षल्यांच्या या दहशतीमुळे काही मजूर तेंदूपत्ता संकलनाचा हंगाम अर्धवट सोडून घराकडे परत येत आहेत. त्यामुळे तेंदूपत्ता संकलन कमी होण्याची शक्यता आहे.
नक्षल बंदचा गावकऱ्यांकडून तीव्र विरोध
गडचिरोली : नक्षल्यांकडून १९ मे रोजी बंद पाळण्यात आला होता. यादरम्यान नक्षलवाद्यांनी हिंसक घटना घडवून आणल्या. नक्षलवाद्यांच्या या कृत्याचा दुर्गम भागातील नागरिकांनी तीव्र विरोध केला आहे. एवढेच नव्हे तर एटापल्ली तालुक्यातील गुरूपल्ली परिसरातील नागरिकांनी नक्षल बॅनरची होळी सुध्दा केली. यावरून नागरिकांमध्ये नक्षलवाद्यांविषयी चिड आहे. मात्र उघडपणे ते विरोध करू शकत नाही.