पालक जिल्हा कचेरीवर धडकले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2017 01:26 AM2017-06-18T01:26:01+5:302017-06-18T01:26:01+5:30
स्थानिक कार्मेल हायस्कूलमधून शैक्षणिक सत्र २०१७ तील इयत्ता दहावी (सीबीएसई)ची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना ...
कार्मेल हायस्कूलच्या निकालाचे प्रकरण : घोळ दुरूस्त न केल्यास उपोषण
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : स्थानिक कार्मेल हायस्कूलमधून शैक्षणिक सत्र २०१७ तील इयत्ता दहावी (सीबीएसई)ची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना शाळा प्रशासनाने अत्यंत कमी गुण दिल्याने विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. चेन्नई सीबीएसई बोर्डाला संबंधित शाळा व्यवस्थापनाने विद्यार्थ्यांचे गुण कमी दिल्याने १७ विद्यार्थ्यांना सीजीपीए हा शुन्य मिळाला आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या पालकाने शनिवारी थेट जिल्हाधिकारी कार्यालय गाठून न्याय देण्यात यावा, अशी मागणी केली.
या संदर्भात पालकांनी निवासी उपजिल्हाधिकारी दुर्वेश सोनवणे यांना निवेदन दिले. तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक व शिक्षणाधिकारी (माध्यमिक) जि.प. गडचिरोली यांच्याही कार्यालयात जाऊन त्यांना निवेदन दिले. यावेळी डॉ. दिलीप बारसागडे, विजय श्रुंगारपवार, शशी किरमोरे, पूर्वा ताडुरवार, रमेश जोशी, पुष्पलता खवळ, प्रदीप गुंडावार, सुनिल धात्रक आदीसह शेकडो पालक उपस्थित होते.
पालकांनी निवेदना म्हटले आहे की, सद्य:स्थितीत सीबीएसई इयत्ता अकरावीचे प्रवेश सुरू झाले असून प्रवेश मर्यादा संपण्याच्या मार्गावर आहे. मात्र कार्मेल हायस्कूलमधील १० वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना सुधारीत गुणपत्रिका न मिळाल्याने ते पुढील महाविद्यालय शिक्षणापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. कारमेल हायस्कूलच्या प्रशासनाकडून पालकांना दिशाभूल करणारी उडवाउडवीचे उत्तरे दिली जात आहे. आम्हाला न्याय न मिळाल्यास २२ जूनपासून अन्यायग्रस्त पालक शाळा प्रशासनाच्या विरोधात आमरण उपोषण करतील, असा इशाराही पालकांनी निवेदनातून दिला आहे. चेन्नई व दिल्ली सीबीएसई बोर्डाकडे पाठपुरावा करून आमच्या पाल्यांना सुधारीत गुणपत्रिका २१ जूनपर्यंत द्यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे.