अर्धवट पुलामुळे बसला पुराचा फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2020 05:00 AM2020-08-23T05:00:00+5:302020-08-23T05:00:30+5:30
आठवडाभरापासून अहेरी उपविभागात जोरदार पाऊस येत आहे. त्यामुळे नदी नाले ओसंडून वाहत आहेत. यावर्षीच्या खरीप हंगामातील दोन महिने तुरळक पावसाने गेल्यानंतर ९ ऑगस्टपासून पावसाने जिल्ह्यात जोर धरला आहे. अहेरी उपविभागातील भामरागड तालुक्यात पूर परिस्थिती अद्यापही कायम आहे. अहेरी लगतच्या गडअहेरी नाल्यावर कमी उंचीचा पूल असल्याने या भागातील पुलावरून पाणी वाहत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अहेरी : तालुका मुख्यालयाजवळ असलेल्या गडअहेरी नाल्यातून भरपूर पाणी वाहत असल्याने परिसराच्या १० ते १२ गावांचा संपर्क तुटला आहे. गडअहेरी येथील नाल्यावर कमी उंचीचा पूल आहे. त्यामुळे पावसाळ्यात दरवर्षी परिसरातील गावांचा संपर्क तुटतो. यावर्षीही त्याचा फटका बसला.
आठवडाभरापासून अहेरी उपविभागात जोरदार पाऊस येत आहे. त्यामुळे नदी नाले ओसंडून वाहत आहेत. यावर्षीच्या खरीप हंगामातील दोन महिने तुरळक पावसाने गेल्यानंतर ९ ऑगस्टपासून पावसाने जिल्ह्यात जोर धरला आहे. अहेरी उपविभागातील भामरागड तालुक्यात पूर परिस्थिती अद्यापही कायम आहे. अहेरी लगतच्या गडअहेरी नाल्यावर कमी उंचीचा पूल असल्याने या भागातील पुलावरून पाणी वाहत आहे. त्यामुळे परिसराच्या १० ते १२ गावातील संपर्क तुटला आहे. ही पूर परिस्थिती पाहण्यासाठी जि. प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी गडअहेरी नाल्यावर भेट देऊन माहिती जाणून घेतली.
गडअहेरी नाल्यासह परिसरातील नाल्यांना पूर आल्याने या भागातील आवागमन बंद आहे. त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. पूर परिस्थितीमुळे अत्यावश्यक कामासाठी बाहेर जाता येत नाही.
कमी उंचीच्या पुलामुळे नागरिकांना मागील अनेक वर्षांपासून त्रास सहन करावा लागत आहे. नवीन पुलाचे काम झाल्याशिवाय समस्या दूर होणार नाही. या सर्व गंभीर समस्यांची माहिती जि. प. अध्यक्षांनी याप्रसंगी घेतली. यावेळी अहेरी येथील आदिवासी विद्यार्थी संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.