वनपरिक्षेत्राधिकारी कार्यालयात रंगली मांसाहाराची पार्टी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2018 12:33 AM2018-09-30T00:33:14+5:302018-09-30T00:36:52+5:30
पेरमिली वनपरिक्षेत्राचे वनपरिक्षेत्राधिकारी व वनपाल यांच्या सेवानिवृत्तीपर कार्यक्रमाचे आयोजन आलापल्ली स्थित वनपरिक्षेत्र कार्यालयात शुक्रवारी करण्यात आले होते. या कार्यक्रमादरम्यान मांसाहाराची पार्टी रंगली.
लोकमत न्यूज नेटवर्क
आलापल्ली : पेरमिली वनपरिक्षेत्राचे वनपरिक्षेत्राधिकारी व वनपाल यांच्या सेवानिवृत्तीपर कार्यक्रमाचे आयोजन आलापल्ली स्थित वनपरिक्षेत्र कार्यालयात शुक्रवारी करण्यात आले होते. या कार्यक्रमादरम्यान मांसाहाराची पार्टी रंगली. याचे फोटो सोशल मीडियावर फिरत असल्याने सदर पार्टी चर्चेचा विषय ठरली आहे.
अहेरी तालुक्यातील पेरमिली वनपरिक्षेत्र कार्यालयाला नक्षल्यांनी दोन ते तीनवेळा आग लावली होती. त्यामुळे मागील चार वर्षांपासून पेरमिलीचे वनपरिक्षेत्र कार्यालय आल्लापल्ली येथे हलविण्यात आले आहे. या कार्यालयासाठी आलापल्ली येथे एक इमारत उपलब्ध करून देण्यात आली असून त्यात सदर कार्यालय सुरू आहे. या वनपरिक्षेत्राचे वनपरिक्षेत्राधिकारी यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली तर एक वनपाल सेवानिवृत्त झाले. या दोघांनाही निरोप देण्यासाठी २८ सप्टेंबर रोजी दिवसा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याबाबचे एक पत्र तयार करून त्यात वनपरिक्षेत्र कार्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे आयोजन वनपरिक्षेत्र कार्यालयातच ठेवण्यात आले होते. यासाठी वनपाल ६०० रूपये, वनरक्षक ३०० रूपये व वनमजुरांकडुन २०० रूपये गोळा करण्यात आला. कार्यक्रमानंतर मांसाहारी जेवनाचे आयोजन करण्यात आले होते.
विशेष म्हणजे मांसाहार कार्यालयाच्या परिसरातच शिजविण्यात आला होता. निरोप समारंभाचा छोटेखानी कार्यक्रम आटोपल्यानंतर कार्यालयातच वनकर्मचारी व अधिकारी यांची जेवनाची पंगत बसली.
शासकीय कार्यालयामध्ये मांसाहारी पार्टीचे आयोजन करण्यावर बंदी आहे. मात्र नियम डावलून या ठिकाणी पार्टीचे आयोजन करण्यात आले. विशेष म्हणजे, जेवन करता वेळेसचे फोटो या कर्मचाऱ्यांनी सोशल मीडियावर टाकले. त्यामुळे हा विषय आलापल्ली परिसरात चर्चीला जात आहे. सदर फोटो लोकमत प्रतिनिधीकडे उपलब्ध आहेत. या पार्टीत सहभागी व आयोजन करणाºया वन कर्मचाºयांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी आहे.
वरिष्ठ वनाधिकारी होते दौऱ्यावर
ज्या दिवशी पार्टीचे आयोजन करण्यात आले होते, त्या दिवशी प्रधान मुख्य वनसंरक्षक नागपूर, मुख्य वनसंरक्षक गडचिरोली हे आलापल्ली परिसरात दौऱ्यावर होते. तरीही या कर्मचाऱ्यांनी मांसाहार पार्टीचे आयोजन करण्याची हिंमत केली. यावरून वन कर्मचारी वरिष्ठ अधिकाऱ्यांना जुमानत नसल्याचे स्पष्ट होत आहे. पार्टीचे आयोजन हा अतिशय गंभीर प्रकार असून या प्रकरणाची चौकशी करून यामध्ये दोषी असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे. अन्यथा इतरही कार्यालयांमध्ये अशा प्रकारच्या मांसाहारी पार्ट्या रंगण्याची शक्यता नाकारता येत नाही.