पेसा कायदा हा दुधारी शस्त्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2017 10:25 PM2017-12-24T22:25:34+5:302017-12-24T22:25:45+5:30
स्वातंत्र्य मिळाल्यानंतर बऱ्याच वर्षांनी म्हणजे, २४ डिसेंबर १९९६ मध्ये पेसा कायदा अंमलात आणला. या कायद्याची जिल्ह्यात अंमलबजावणी सुरू झाली असून हा कायदा आदिवासी समाजाच्या विकासासाठी व गावकल्याणासाठी दुधारी शस्त्र आहे,......
लोकमत न्यूज नेटवर्क
धानोरा : स्वातंत्र्य मिळाल्यानंतर बऱ्याच वर्षांनी म्हणजे, २४ डिसेंबर १९९६ मध्ये पेसा कायदा अंमलात आणला. या कायद्याची जिल्ह्यात अंमलबजावणी सुरू झाली असून हा कायदा आदिवासी समाजाच्या विकासासाठी व गावकल्याणासाठी दुधारी शस्त्र आहे, असे प्रतिपादन जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी यांनी केले.
धानोरा तालुक्यातील सर्व ग्रामसभा व धानोरा तालुका ग्रामसभा महासंघाच्या संयुक्त विद्यमाने रविवारी अनुसूचित क्षेत्रातील पेसा व वनहक्क कायदा दिवसानिमित्त तालुका महोत्सव येथील माँ दंतेश्वरी देवस्थान परिसरात पार पडला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी धानोराचे माजी जमिनदार दौलतशहा मडावी होते. प्रमुख अतिथी म्हणून आमदार डॉ. देवराव होळी, सामाजिक कार्यकर्ते देवाजी तोफा, पं.स. सभापती अजमन राऊत, उपसभापती अनुसया कोरेटी, जि.प. सदस्य मनोहर पोरेटी, प्रकाश महाराज काटेंगे, माजी जि.प. सदस्य शांता परसे, काशिराम टेकाम, नगराध्यक्ष वर्षा चिमुरकर, नगसेविका रेखा हलामी, गीता वालको, मंगला मडावी, माधव गोटा, दौलत धुर्वे, केसरी उसेंडी, गाव पुजारी गणू जांगी आदी मान्यवर उपस्थित होते. पुढे बोलताना डॉ. नामदेव उसेंडी म्हणाले, पेसा कायद्यामुळे आदिवासी समाजाचा शैक्षणिक आर्थिक स्तर उंचावलेला असून राजकारणातील पुढील दिशा दर्शविणारा कायदा आहे. आदिवासी मुलांनी उच्च शिक्षण घेऊन डॉक्टर, इंजिनिअर, जिल्हाधिकारी व वरिष्ठ अधिकारी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.
याप्रसंगी आमदार डॉ. होळी म्हणाले, ग्रामसभेचा अध्यक्ष हा गावाचा विकास करणारा व्यक्ती असला पाहिजे. त्याचा कार्यकाळ तीन वर्ष असावा. विकास पुरूष अध्यक्ष राहिल्यास पेसा कायद्याच्या अंमलबजावणीतून गावाचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही, असे त्यांनी सांगितले. पेसा क्षेत्रातील ग्रामसभा कोट्याधीश होण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे, असे डॉ. होळी यावेळी म्हणाले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक माधव गोटा, संचालन सुरेश चौधरी यांनी केले. याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते देवाजी तोफा यांनी पेसा कायद्यातील तरतूदी व ग्रामस्थांनी स्वीकारावयाची जबाबदारी याबाबत मार्गदर्शन केले. महोत्सवाला धानोरा तालुक्यातील सर्व ग्रामसभांचे पदाधिकारी, सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. उद्घाटनानंतर आदिवासी नृत्य सादर करण्यात आले. यातून आदिवासी संस्कृतीचे दर्शन ग्रामसभांनी घडविले.