एटापल्लीचे वनोद्यान बनले कुरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2020 06:00 AM2020-03-01T06:00:00+5:302020-03-01T06:00:36+5:30
वन विभागाने गडचिरोली जिल्ह्यात विविध ठिकाणी वनोद्यान तयार केले होते. एटापल्ली येथील वनोद्यानामध्ये विविध प्रकारची औषधी वनस्पती, १६ प्रकारच्या बांबूचे रोपवन, २५ प्रकारचे गुलाब व इतर फुलझाडे लावण्यात आली होती. तसेच बच्चेकंपनीसाठी झुले, ध्यानकुटी, बनविण्यात आली होती. कच्च्या रस्त्याच्या बाजुला विटा लावल्या होत्या.
रवी रामगुंडेवार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
एटापल्ली : लाखो रुपये खर्चून वन विभागाने कसनसूर मार्गावर २०१२ मध्ये तब्बल दोन हेक्टर जागेवर वनोद्यान उभारले. मात्र या वनोद्यानाकडे आता दुर्लक्ष झाले असल्याने वनोद्यानात गवत उगवले आहे. कुंपण तोडून मोकाट जनावरे वनोद्यानात चरताना दिसून येतात.
वन विभागाने गडचिरोली जिल्ह्यात विविध ठिकाणी वनोद्यान तयार केले होते. एटापल्ली येथील वनोद्यानामध्ये विविध प्रकारची औषधी वनस्पती, १६ प्रकारच्या बांबूचे रोपवन, २५ प्रकारचे गुलाब व इतर फुलझाडे लावण्यात आली होती. तसेच बच्चेकंपनीसाठी झुले, ध्यानकुटी, बनविण्यात आली होती. कच्च्या रस्त्याच्या बाजुला विटा लावल्या होत्या. या विटांना रंगरंगोटी करण्यात आली होती. त्यामुळे वनोद्यान एटापल्ली येथील नागरिकांना आकर्षीत करीत होते.
या वनोद्यानाची देखरेख करण्याकरिता वनमजूर नेमण्यात आला होता. त्याची २४ तास वनोद्यानात ड्युटी असायची. एटापल्ली येथील शेकडो नागरिक या उद्यानात फिरायसाठी जात होते. एटापल्ली शहराचे हे एक आकर्षण केंद्र बनले होते. मात्र निधी नसल्याचे कारण पुढे करून मागील दोन ते तीन वर्षांपासून या उद्यानाकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. येथील वनमजुराला हटविण्यात आल्याने देखभाल व दुरूस्ती करणारा एकही व्यक्ती आता शिल्लक नाही. त्यामुळे वनोद्यानात गवत उगवले आहे. मोकाट जनावरांनी फुलझाडे, औषधी वनस्पती फस्त केली आहे. शासनाचे लाखो रुपये पाण्यात गेले आहेत.
वन विभागाने उत्पन्नातून खर्च करावे
गडचिरोली जिल्ह्यात वन विभाग हा सर्वात श्रीमंत असलेला विभाग आहे. जंगलातील लाकडे विकून दरवर्षी शेकडो कोटी रुपयांचा निधी वन विभागाकडे जमा होते. सदर जंगलाची देखरेख वन विभागासोबतच स्थानिक नागरिकांनीही केली आहे. त्यामुळे वन विभागाएवढाच स्थानिक नागरिकांचाही अधिकार आहे. वन विभागाला मिळणाऱ्या उत्पन्नातून काही निधी बगिचाची देखभाल करण्यावर खर्च करावा, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे.
सदर उद्यानाची निर्मिती तत्कालीन वन परिक्षेत्राधिकारी एस. एन. टेकाम यांच्या कालावधीत झाली. वनोद्यान बनविण्यासाठी या ठिकाणचे पूर्वीचे अतिक्रमण काढण्यात आले. त्यावेळी फार मोठा विरोध झाला. या विरोधाचा सामना करीत टेकाम यांनी अतिक्रमण हटवून वनोद्यान तयार केले. मात्र काही कालावधीतच वनोद्यानाची दुरवस्था झाली आहे. यावर प्रतिक्रिया देताना एस. एम. टेकाम म्हणाले, उद्यानाची वाईट स्थिती बघून आपल्याला अतिशय दु:ख होत आहे. वन विभागाकडे निधी नसेल तर नागरिकांकडून तिकीट घेऊन वनोद्यानाची देखभाल करावी, असा सल्ला दिला.
तारेचे कंपाऊंड तुटले आहे. निधी नसल्याने काहीच करता येत नाही. वन मजुरांकडून काम करण्याची मजुरीसुध्दा मंजूर होत नाही.
- पी. एन. कुनघाडकर,
क्षेत्र सहायक, एटापल्ली
उद्यानाची देखभाल करावी यासाठी मागील पाच वर्षांपासून आपण वन विभागाकडे लेखी पाठपुरावा करीत आहोत. मात्र याकडे वन विभागाचे दुर्लक्ष झाले आहे. वनमजूर वनाधिकाऱ्यांच्या घरी कामे करतात. तेच मजूर वनोद्यानात का लावले जात नाही?
- महेश पुल्लूरवार,
अध्यक्ष, व्यापारी संघटना एटापल्ली