पातागुडमला पोलीस ठाणे होणार
By admin | Published: March 1, 2016 12:55 AM2016-03-01T00:55:51+5:302016-03-01T00:55:51+5:30
तालुका मुख्यालयापासून ६७ किमी अंतरावर महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवर नवीन पोलीस ठाणे (चौकी) प्रस्तावित करण्यात आली आहे.
युध्दस्तरावर कामास प्रारंभ : महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवरील गाव
सिरोंचा : तालुका मुख्यालयापासून ६७ किमी अंतरावर महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवर नवीन पोलीस ठाणे (चौकी) प्रस्तावित करण्यात आली आहे. दोन आठवड्यापूर्वी पातागुडम येथे माओवाद्यांनी केलेल्या एका नागरिकाच्या हत्याकांडाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने सदर निर्णय तडकाफडकी घेतला आहे. पातागुडम येथे लवकरच नवे पोलीस ठाणे अस्तित्वात येणार आहे.
१५ फेब्रुवारी २०१६ रोजी सायंकाळी ६.३० वाजता पातागुडम येथील संटी गोपय्या गोरगोंडा (४०) या आदिवासी इसमाची माओवाद्यांनी हत्या केली होती. या घटनेनंतर गडचिरोलीचा पोलीस विभाग सतर्क झाला आहे. पातागुडम येथे पोलीस चौकीचे बांधकाम सुरू करण्यात आले असून त्याची प्राथमिक प्रत्यक्ष कृती म्हणून २९ फेब्रुवारी रोजी सोमवारला बांधकाम साहित्याची सिरोंचामार्गे वाहतूक करण्यात आली. सकाळी ९ वाजून १७ मिनिटांनी प्रथम एक हेलिकॉप्टर थेट पातागुडमच्या दिशेने निघून गेले. नंतर काही वेळाने सडकमार्गे अंदाजे ९० वाहनांचा ताफा अंकिसा-आसरअल्ली या राष्ट्रीय महामार्गे प्रस्तावितस्थळी दाखल झाला. वाहनामध्ये सिमेंट, विटा, लोखंडी अँगल्स, कलर्स आदी साहित्य होते. यासोबतच मिस्कर, एक्झॉव्हेटर, भूसुरूंग निरोधक वाहनेही होती. या वाहनात बांधकाम कारागिर व मजुरांचे पथकही होते. यामुळे अंदाजे दीडशे घरांच्या व तीनशे लोकसंख्या असलेल्या पातागुडम गावाला सोमवारी छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते. लवकरच या पोलीस ठाण्याची इमारत बांधून पूर्ण होईल, असा विश्वास गृह विभागाला आहे.
असामाजिक घटनांना प्रतिबंध लागणार
सोमनूरची इंद्रावती नदी ओलांडल्यावर छत्तीसगडची भद्रकाली पोलीस चौकी अवघ्या दोन-अडीच किमी अंतरावर आहे. पातागुडम परिवहन घाटाहून इंद्रावती नदी पलिकडे छत्तीसगडचे पहिले गाव ‘तिमेड’ वसले आहे. येथून १० किमी अंतरावर भोपालपटणम पोलीस ठाण्ो आहे. आता महाराष्ट्र शासनाने पातागुडम येथे पोलीस चौकी उभारण्याच्या कामाला प्रत्यक्ष सुरूवात केली असल्याने असामाजिक घटनांना प्रतिबंध लागणार आहे.