पितृपक्षातील पूजनीय कावळा

By admin | Published: September 30, 2016 01:38 AM2016-09-30T01:38:46+5:302016-09-30T01:38:46+5:30

वाढत्या प्रदूषणाचा परिणाम मानवासह पशुपक्ष्यांवरही होत आहे. याची प्रचिती पर्यावरणातील होत असलेल्या जीवसृष्टीच्या

Paternal cottage | पितृपक्षातील पूजनीय कावळा

पितृपक्षातील पूजनीय कावळा

Next

महत्त्व आजही कायम : प्रदूषण, टॉवर, रसायने प्रजातींसाठी ‘काळ’
देसाईगंज : वाढत्या प्रदूषणाचा परिणाम मानवासह पशुपक्ष्यांवरही होत आहे. याची प्रचिती पर्यावरणातील होत असलेल्या जीवसृष्टीच्या ऱ्हासावरून नेहमीच आलेली आहे. पर्यावरणातील तसेच हिंदू संस्कृतीतील महत्त्वपूर्ण मानला जाणारा पक्षी कावळा आज वाढत्या प्रदूषणामुळे जवळजवळ नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. वायू प्रदूषण, मोबाईल टॉवरमधील धोकादायक तरंग तसेच शेती व इतर क्षेत्रात वापरल्या जाणाऱ्या रसायनांच्या परिणामांमुळे आजघडीला कावळ्यांची संख्या कमी झाली आहे. तरीसुद्धा पितृपक्षातील कावळ्याचे महत्त्व कायम आहे. सर्वपित्री अमावस्या शुक्रवारी साजरी होत आहे. या निमित्ताने सण व कावळ्याच्या महत्त्वाचा घेतलेला हा आढावा.

पितृपक्षाच्या पंधरवड्यात प्राचीन काळापासून कावळ्याला एक वेगळे महत्त्व आहे. ही परंपरा हिंदू संस्कृतीत आजही जोपासली जात आहे. कावळा हा चतूर व बुद्धिमान पक्षी आहे. देशी कावळा, डोम कावळा, पहाडी कावळा तर चवथा अत्यंत दुर्मीळ आढळणारा पांढरा कावळा असे कावळ्यांच्या जातीचे चार प्रकार पाहावयास मिळतात. ग्रामीण भागात बहुतेक देशी व डोम कावळा आढळतो. परंतु पूर्वीच्या तुलनेत आज झालेल्या प्रदूषणामुळे कावळ्यांचे अस्तित्त्व धोक्यात आले आहे. श्री गणेशाचे विसर्जन झाल्यानंतर पितृपक्षाला सुरूवात होते. या पंधरवड्यात घरावर टाकलेले अन्न कावळ्यांनी खावे याकरिता हाजीहाजी करावी लागते. पितृपक्षात पूजापाठ केल्यानंतर द्रोणातील नवैैद्य जोपर्यंत कावळा ग्रहण करीत नाही. तोपर्यंत सारेजण जेवणाची वाट पाहत असतात. पितृपक्षात फिरणाऱ्या कावळ्यांना यावेळी सुगीचे दिवस असतात. पितृपक्षात पूजापाठ केल्यानंतर नवैैद्याचा अधिकार प्रथम कावळ्यांना दिला जातो. पूर्वजांच्या रूपात कावळा घरी अन्नग्रहण करण्याकरिता येतो, असाही समज ग्रामीण भागात आहे. किंवा कावळ्याच्या पिलांना, कावळ्याला माणसाचा स्पर्श झाला तर त्या कावळ्यावर इतर कावळे हल्ला करतात, असाही समज ग्रामीण भागात आहे. एकूणच, पितृपक्षातील पंधरवड्यात कावळ्याचे महत्त्व आजही कायम आहे. (प्रतिनिधी)

अमावस्येला अशी होते पूजा
पितृपक्ष अमावस्येच्या दिवशी पितरांसाठी खास पक्वानांचे पात्र तयार केले जाते. त्याची पूजा केल्यानंतरच पात्रातील सर्व पदार्थ एका पळसाच्या किंवा घोगर वनस्पतीच्या पानांच्या द्रोणात काढून ते अंगणात ठेवतात. त्यामागील उद्देश असा की, कावळ्यांनी चोच मारून ते थोडेतरी ग्रहण करावे. कारण कावळ्यांनी चोच मारल्यानंतर ते पात्र स्वर्गातील आपल्या पितरांना पावन होते, असा समज हिंदू संस्कृतीत आजही कायम आहे. त्यामुळे पितृपक्षात कावळ्यांचे महत्त्व पूजनीय व अनन्यसाधारण आहे.

दुर्गम भागातून कावळे लुप्त
जिल्ह्यातील जंगलात अनेक जातींचे पशुपक्षी आढळून येतात. यात कावळ्यांची संख्या पूर्वी मोठ्या प्रमाणात होती. परंतु मागील काही वर्षांपासून प्रत्येक गावात आढळणारा कावळा दुर्गम भागातून लुप्त झाला आहे. चिमणी व इतर पक्ष्यांचा ठावठिकाणाही दुर्गम भागातील पाड्यांमध्ये दिसून येत नाही. कावळ्यांची शिकार करून त्यांचे पंख एका बांबूच्या टोकावर अडकवून ठेवण्याची प्रवृत्ती बळावल्यामुळे तसेच शिकारी वाढल्याने दुर्गम भागातील कावळे लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत, असे संख्येवरून दिसून येते.

Web Title: Paternal cottage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.