अहेरीतून ‘रुग्ण रेफर टू गडचिरोली’चे प्रमाण वाढले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2019 12:09 AM2019-08-01T00:09:56+5:302019-08-01T00:10:47+5:30
पावसाळ्याच्या दिवसात अहेरी उपविभागात विविध आजाराच्या रुग्णांची संख्या दरवर्षी वाढत असते. यावर्षी सुद्धा अशीच परिस्थिती असून गेल्या १०-१२ दिवसांपासून रुग्णांनी अहेरीचे उपजिल्हा रुग्णालय हाऊसफुल्ल असल्याचे दिसून येत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अहेरी : पावसाळ्याच्या दिवसात अहेरी उपविभागात विविध आजाराच्या रुग्णांची संख्या दरवर्षी वाढत असते. यावर्षी सुद्धा अशीच परिस्थिती असून गेल्या १०-१२ दिवसांपासून रुग्णांनी अहेरीचे उपजिल्हा रुग्णालय हाऊसफुल्ल असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान विविध सोयीसुविधांचा अभाव व डॉक्टर, कर्मचाऱ्यांच्या रिक्त पदांमुळे या रुग्णालयातून गडचिरोलीच्या रुग्णालयात रुग्ण रेफर केले जात आहेत.
अहेरी उपविभागात भामरागड, एटापल्ली, सिरोंचा, अहेरी, मुलचेरा आदी पाच तालुक्यांचा समावेश आहे. या पाच तालुक्यातील रुग्णांना योग्य आरोग्यसेवा मिळावी, यासाठी अहेरी तालुका मुख्यालयी उपजिल्हा रुग्णालय सुरू करण्यात आले. सदर रुग्णालयात एका वैद्यकीय अधीक्षकांसह सात वैद्यकीय अधिकारी कार्यरत आहेत. मात्र सदर रुग्णालयात विविध सुविधांचा अभाव आहे. खाटांची संख्या कमी असल्यामुळे बºयाच रुग्णांना खाली फरशीवर गादीवर झोपून औषधोपचार घ्यावा लागत आहे. येथील पाणीटंचाईची समस्या लक्षात घेऊन रुग्णालय प्रशासनाने ३ लाख रुपयांच्या खर्चातून हातपंपाची व्यवस्था केली. मात्र सदर हातपंप सद्य:स्थितीत बंद आहे. त्यामुळे पाण्यासाठी येथील रुग्णांना इतरत्र भटकावे लागत आहे. सदर रुग्णालयात विद्युत पुरवठा खंडित झाल्यावर टॉर्चचा आधार घेतला जातो. यासंदर्भात वैद्यकीय अधीक्षक डॉ.कन्ना मडावी यांनी सांगितले की, साधारण रुग्णांवर येथेच उपचार केला जातो. मात्र उपकरणांअभावी गंभीर रुग्णांना गडचिरोलीला हलविले जाते.
कर्मचाऱ्यांची आठ पदे रिक्त
अहेरीच्या उपजिल्हा रुग्णालयात वर्ग ३ च्या कर्मचाऱ्यांची एकूण ३० पदे मंजूर आहेत. यापैकी २२ पदे भरण्यात आली असून ८ पदे रिक्त आहेत. रिक्त पदांमध्ये सहायक अधीक्षक १, परिसेविका २, सहायक अधिसेविका १, औषध निर्माता १, प्रयोगशाळा तंत्रज्ञ १ व नेत्र चिकित्सा सहाय्यक तसेच वाहनचालक आदी पदांचा समावेश आहे.