रुग्णांनी महिला रुग्णालय फुल्ल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2018 01:15 AM2018-10-11T01:15:21+5:302018-10-11T01:19:37+5:30

स्थानिक इंदिरा गांधी चौकालगतच्या जिल्हा महिला व बाल रुग्णालयात जिल्ह्यातील ग्रामीण, उपजिल्हा रुग्णालयासह लगतच्या चंद्रपूर व गोंदिया जिल्ह्यातून गर्भवती महिला व बाल रुग्ण मोठ्या संख्येने रेफर होत असल्याने सदर रुग्णालय रुग्णांनी हाऊसफुल्ल झाले आहे.

Patients get female hospital full | रुग्णांनी महिला रुग्णालय फुल्ल

रुग्णांनी महिला रुग्णालय फुल्ल

googlenewsNext
ठळक मुद्दे३०० च्या आसपास रुग्ण दाखल : तालुक्यासह जिल्हाबाहेरून ‘रेफर टू गडचिरोली’चे प्रमाण वाढले

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : स्थानिक इंदिरा गांधी चौकालगतच्या जिल्हा महिला व बाल रुग्णालयात जिल्ह्यातील ग्रामीण, उपजिल्हा रुग्णालयासह लगतच्या चंद्रपूर व गोंदिया जिल्ह्यातून गर्भवती महिला व बाल रुग्ण मोठ्या संख्येने रेफर होत असल्याने सदर रुग्णालय रुग्णांनी हाऊसफुल्ल झाले आहे. १०० खाटांच्या या रुग्णालयात गेल्या दोन महिन्यांपासून ३०० च्या आसपास रुग्ण दाखल होत आहेत.
जिल्हा महिला व बाल रुग्णालयात १०० खाटांची व्यवस्था असून ५० खाटा महिला रुग्णांसाठी व ५० खाटा बाल रुग्णांसाठी विभाजीत करण्यात आल्या आहेत. सदर रुग्णालयात पाच कक्ष स्थापन करण्यात आले आहे. यामध्ये गरोदर माता, प्रसूती पश्चात-नार्मल व सिजर प्रसूती, १२ वर्षापर्यंतच्या बालकांसाठी एक कक्ष, नवजात शिशू व कुपोषित बालकांसाठी असलेल्या कक्षांचा समावेश आहे. शासनाच्या वतीने येथे १०० खाटांच्या रुग्ण व्यवस्थेनुसार सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. मात्र या रुग्णालयात गेल्या चार ते पाच महिन्यांपासून रुग्ण संख्या दुपटीहून अधिक वाढल्याने येथे सुविधा कमी पडत आहेत.
आरमोरी, अहेरी, कुरखेडा या तिनही उपजिल्हा रुग्णालयात सिजर प्रसूतीची व्यवस्था आहे. मात्र या रुग्णालयातूनही महिला रुग्णालयात प्रसूतीसाठी गर्भवती मातांना रेफर केले जात आहे. याशिवाय प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालयातूनही दररोज सदर रुग्णालयात रुग्ण दाखल होत आहेत. बाल रुग्णांचीही संख्या येथे वाढली आहे.
गोंदिया जिल्ह्याच्या केशोरी, अर्जुनी मोरगाव तसेच चंद्रपूर जिल्ह्याच्या नागभिड समोरील काम्पा परिसरातील गर्भवती माता गडचिरोलीच्या महिला रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल होत आहेत. विशेष म्हणजे चार दिवसांपूर्वी या रुग्णालयातील भरती असलेल्या रुग्णांचा आकडा ३०४ इतका होता.
आरोग्य विभागाअंतर्गत कार्यरत प्रत्येक शासकीय रुग्णालय तथा संस्थांना संस्थेअंतर्गत प्रसूती करण्याचे उद्दिष्ट शासनाकडून दिले जाते. मात्र जिल्ह्याच्या अन्य रुग्णालयात नार्मल प्रसूतीचे प्रमाण अधिक आहे. सिजर प्रसूतीच्या सर्व सोयीसुविधा इतर रुग्णालयात फारशा उपलब्ध नसल्याने अशा रुग्णांना जिल्हा महिला रुग्णालयात रेफर केले जात आहे. महिला रुग्णालयात प्रसूतीसाठी चार तज्ज्ञ डॉक्टर कार्यरत आहेत. रुग्णसंख्येच्या तुलनेत सदर रुग्णालयात मनुष्यबळ, जागा, इमारत अपुरी पडत आहे. रुग्णसेवेसाठी उपलब्ध असलेली वाहनेही अपुरी पडत आहेत. महिला रुग्णालयाला चार वाहन उपलब्ध करून देण्यात आले आहेत. यापैकी एक रुग्णवाहिका नादुरूस्त स्थितीत आहे. रुग्णांची गैरसोय होऊ नये, यासाठी तीन खासगी रुग्णवाहिकांची व्यवस्था करण्यात आली आहे.
खाटांची व्यवस्था वाढविण्याची आवश्यकता
जिल्हा महिला व बाल रुग्णालयात खाटांची कमतरता भासत असल्याने अनेक रुग्णांना खाली गादीवर झोपून औषधोपचार घ्यावा लागत आहे. रुग्णांची गैरसोय टाळण्यासाठी शासनाच्या वतीने सदर रुग्णालयात खाटांची व्यवस्था वाढविण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. खाटांची संख्या वाढविण्याबाबतचा प्रस्ताव रुग्णालय प्रशासनातर्फे तयार केला जात असल्याची माहिती आहे. शासनाने सदर रुग्णालयात आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्या, अशी मागणी होत आहे.
बाह्य रुग्ण विभागातही रुग्णांची गर्दी
जिल्हा महिला व बाल रुग्णालयाच्या बाह्य रुग्ण विभागात सकाळी व सायंकाळी या दोन्ही वेळेला तपासणी व औषधोपचारासाठी रुग्णांची गर्दी होत आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात हे रुग्णालय असल्याने गडचिरोली शहर व परिसरातील महिला व बाल रुग्ण येथे मोठ्या संख्येने उपचारासाठी येत आहेत. ओपीडीमध्ये अनेक कक्षांसमोर रुग्णांच्या रांगा दिसून येतात. येथे मनुष्यबळ वाढविण्याची गरज आहे.

Web Title: Patients get female hospital full

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.