अडीच महिन्यांपासून पोटेगावला एसटीचे दर्शन नाही
By admin | Published: September 12, 2016 02:12 AM2016-09-12T02:12:29+5:302016-09-12T02:12:29+5:30
गडचिरोली आगारातून सुटणाऱ्या गडचिरोली-गिलगाव-पोटेगाव या बसचे मागील अडीच महिन्यांपासून
अतिरिक्त भुर्दंड नागरिकांच्या माथी
पोटेगाव : गडचिरोली आगारातून सुटणाऱ्या गडचिरोली-गिलगाव-पोटेगाव या बसचे मागील अडीच महिन्यांपासून पोटेगाववासीयांना दर्शनच झाले नाही. त्यामुळे अनेक प्रवाशांना खासगी वाहन व पायी प्रवास करावा लागत आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या गडचिरोली आगाराने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.
गडचिरोली आगारातून सकाळी ७ वाजता व दुपारी ३.३० वाजता गडचिरोली-गिलगाव-पोटेगाव अशी बसफेरी आहे. ही बस गडचिरोली आगारातून सुटते. मागील दोन-अडीच महिन्यांपासून पोटेगाव बसस्थानकावर येतच नाही. बरेचवेळा पोटेगाव बसस्थानकावर प्रवाशी बसची वाट पाहत उभे असतात. कुनघाडा, चामोर्शी, अहेरीकडे जाणाऱ्या प्रवाशांना आता गडचिरोलीवरून अतिरिक्त पैसे मोजून प्रवास करावा लागत आहे. या दोन्ही बसगाड्यांमुळे पोटेगावच्या पंचक्रोशीतील नागरिकांना चांगली सोय होती. परंतु बसगाडी येत नसल्याने नागरिक त्रस्त आहेत. याबाबत आगार व्यवस्थापकांनी तत्काळ चौकशी करून पोटेगावला बसफेरी आणण्याबाबत उपाययोजना कराव्यात, अशी मागणी परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे. (वार्ताहर)