एकच दिवस उघडली पत्तीगावची शाळा
By Admin | Published: November 22, 2014 01:24 AM2014-11-22T01:24:09+5:302014-11-22T01:24:09+5:30
येथून १० किमी अंतरावर असलेल्या पत्तीगाव येथील शाळा चालू सत्रात केवळ १५ आॅगस्ट या एकाच दिवशी उघडण्यात आली.
संजय गज्जलवार जिमलगट्टा
येथून १० किमी अंतरावर असलेल्या पत्तीगाव येथील शाळा चालू सत्रात केवळ १५ आॅगस्ट या एकाच दिवशी उघडण्यात आली. शाळेत शिक्षकच येत नसल्याने नाईलाजास्तव शाळेतील विद्यार्थी जंगलात गुरे चारण्यासाठी नेत असल्याचे भयावह वास्तव प्रत्यक्ष दिसून आले.
पत्तीगाव येथे १ ते ४ पर्यंतचे वर्ग असून यामध्ये १८ विद्यार्थी पटसंख्येवर दाखल आहेत. या शाळेसाठी शिक्षण विभागाने झेड. एम. पोटावी यांची नियुक्ती केली आहे. मात्र २६ जूनपासून शाळेला प्रारंभ होऊनही एकही दिवस या शाळेतील शिक्षक शाळेमध्ये आले नाही. १५ आॅगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने शाळेच्या परिसरात झेंडावंदन करण्यासाठी आले होते. झेंडावंदनाचा कार्यक्रम आटोपल्यानंतर तत्काळ निघून गेले. तेव्हापासून सदर शिक्षकाचे गावातील नागरिकांनी तोंडही बघीतले नाही.
सत्र सुरू झाल्यानंतर बरेच विद्यार्थी अध्ययनासाठी नियमितपणे १० वाजता शाळेमध्ये जात होते. मात्र शिक्षकच येत नसल्याने दुपारी १ ते २ वाजेपर्यंत वाट बघून घराकडे परतत होते. हा प्रकार जवळपास एक महिना चालला. त्यानंतर शिक्षक येत नसल्याचे पाहून पालकांनी विद्यार्थ्यांना शाळेमध्ये पाठविणेच बंद केले. त्याऐवजी आता हे विद्यार्थी जंगलात गुरे चारण्यासाठी नेत आहेत. त्याचबरोबर आईवडिलांना शेतीच्या कामासाठी मदत करीत आहेत.
प्रत्यक्ष शाळेला भेट दिली असता, या शाळेच्या सभोवताल असलेल्या कचरा व धुळीवरून सदर शाळा सहा महिने उघडण्यात आली नसावी, हे स्पष्ट दिसून येते. याच शाळेतील वर्ग दुसरीचा सुरेश कोहलू मडावी हा विद्यार्थी जंगलामध्ये गुरे चारण्यासाठी नेत आहेत. त्याला शाळेबद्दल विचारले असता, शाळा कधीच उघडत नसल्याने जंगलात गुरे चारण्यासाठी आलो असल्याचे सांगितले. या विद्यार्थ्याला मराठी बोलता येत नव्हते.
विद्यार्थ्यांचे भवितव्य घडण्यासाठी शासन गाव तिथे शाळा उघडल्या आहेत व शिक्षकांना गलेगट्ट पगार देत आहे. मात्र दुर्गम भागातील शिक्षक शाळेत जातच नसून घरबसल्या पगार उचलत आहेत. पत्तीगाव येथील शिक्षक पोटावी यांच्या या कारभारामुळे नागरिक त्रस्त असून कारवाई करण्याची मागणी केली आहे. विस्तार अधिकारी व केंद्रप्रमुखांनी वेळोवेळी शाळेला भेटी देणे आवश्यक आहे. मात्र दस्तरखुद्द केंद्रप्रमुखच एकचवेळा भेट दिली असल्याचे सांगत आहेत. यावरून केंद्रप्रमुखसुद्धा कामचुकारपणा करीत असल्याने त्यांच्यावरही कारवाईची मागणी होत आहे.