पावसाने पुलाची दयनीय अवस्था
By admin | Published: July 13, 2017 02:10 AM2017-07-13T02:10:27+5:302017-07-13T02:10:27+5:30
जनतेच्या दळणवळणासाठी सोयीचे व्हावे म्हणून रांगी ते वैरागड या मार्गावर दोन पुलाचे बांधकाम करण्यात आले.
रांगी ते वैरागड मार्ग : चिखलाचे साम्राज्य निर्माण झाल्याने वाहनधारक प्रचंड त्रस्त
लोकमत न्यूज नेटवर्क
रांगी : जनतेच्या दळणवळणासाठी सोयीचे व्हावे म्हणून रांगी ते वैरागड या मार्गावर दोन पुलाचे बांधकाम करण्यात आले. रांगी ते कोरेगाव व कुकडी ते लोहारादरम्यान पुलाचे बांधकाम करण्यात आले. मात्र पहिल्याच मुसळधार पावसाने पुलावरील मुरूमावर खड्डे निर्माण झाले व यात पावसाचे पाणी साचले. त्यामुळे मार्गक्रमण करणाऱ्या वाहनधारकांना प्रचंड त्रास होत आहे. चिखलामुळे वाहने फसून अपघात होण्याची शक्यता बळावली आहे.
रांगी ते वैरागड मार्गावर पुलाचे बांधकाम पूर्णत्वास आले. मात्र पुलापासून असलेल्या रस्त्याचे काम अर्धवट असल्याने अनेक समस्यांना नागरिकांना तोंड द्यावे लागत आहे. प्रशासनाच्या नियोजन शून्यतेमुळे व संबंधित कंत्राटदाराच्या दुर्लक्षितपणामुळे वाहनधारकांना या मार्गावरून खडतर व धोकादायक प्रवास करावा लागत आहे. येत्या काही दिवसात पावसाचा जोर वाढल्यास चिखलामुळे या मार्गावरील रहदारी बंद होण्याची शक्यता आहे. बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या पुलाची तत्काळ पाहणी करून येथे ठोस उपाययोजना करून पूल व रस्त्याची समस्या मार्गी लावावी, अशी मागणी रांगी परिसरातील नागरिकांनी केली आहे.
गतवर्षी पुलाअभावी या ठिकाणी अनेक वाहनधारकांची वाहने फसली. कित्येकांना वाहन ढकलत न्यावे लागले. नागरिकांच्या मागणीची दखल घेऊन येथे पुलाचे बांधकाम करण्यात आले. मात्र पूल बांधकामानंतर दगड व मुरूमाची योग्यरित्या पिचिंग न झाल्याने ही समस्या उद्भवली आहे. रांगी-वैरागड मार्गावर वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात राहत असल्याने योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी आहे.