रांगी-धानोरा मार्ग पूर्णपणे उखडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2018 12:52 AM2018-05-17T00:52:57+5:302018-05-17T00:52:57+5:30
धानोरा तालुक्यातील रांगी-धानोरा या १८ किमी रस्त्याचे डांबरीकरण पूर्णत: उखडले असून या मार्गावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे निर्माण झाले आहेत. परिणामी खड्ड्यांमुळे या मार्गावर गेल्या काही दिवसांपासून अपघातांचे प्रमाण वाढले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
रांगी : धानोरा तालुक्यातील रांगी-धानोरा या १८ किमी रस्त्याचे डांबरीकरण पूर्णत: उखडले असून या मार्गावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे निर्माण झाले आहेत. परिणामी खड्ड्यांमुळे या मार्गावर गेल्या काही दिवसांपासून अपघातांचे प्रमाण वाढले आहे.
रांगी-मोहली-धानोरा या मार्गावर वाहनांची नेहमीच मोठी वर्दळ असते. धानोरा हे तालुका मुख्यालयाचे एकमेव ठिकाण असल्याने या मार्गावरून मोठ्या प्रमाणात वाहनांचे आवागमन सुरू असते. धानोरा येथील तहसील कार्यालय, बँका, पंचायत समिती, महाविद्यालय आहे. विविध कामासाठी रांगी परिसरातील नागरिक व विद्यार्थी याच मार्गाने धानोराकडे ये-जा करतात. मात्र सदर मार्गाची प्रचंड दुरवस्था झाल्याने या मार्गावरील प्रवास धोकादायक झाला आहे.
रांगी परिसरातील नागरिकांनी यापूर्वी अनेकदा सदर मार्गाच्या पक्क्या दुरूस्तीच्या मागणीला घेऊन शासन व प्रशासनस्तरावर निवेदने दिली. त्यानंतर पाठपुरावा करण्यात आला. मात्र सदर मार्गाच्या दुरूस्तीच्या कामाकडे लोकप्रतिनिधींसह संबंधित यंत्रणेचेही प्रचंड दुर्लक्ष झाले आहे. पावसाळ्यापूर्वी सदर मार्गाची पक्की दुरूस्ती करण्यात यावी, अशी मागणी रांगी परिसरातील नागरिकांनी केली आहे. सदर मार्गाची बकाल अवस्था झाल्याने गडचिरोलीवरून धानोराकडे जाण्यासाठीही बराच वेळ लागत आहे.