विकासकामे गुणवत्तापूर्ण होतील याकडे लक्ष द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2019 12:02 AM2019-07-14T00:02:46+5:302019-07-14T00:03:27+5:30
जिल्ह्यातील विकास कामांसाठी निधी कमी पडू देणार नाही. मात्र प्राप्त झालेल्या निधीतून गुणवत्तापूर्ण विकासकामे करण्याकडे अधिकाऱ्यांनी विशेष लक्ष द्यावे, असे निर्देश पालकमंत्री तथा जिल्ह्याचे वने, वित्त व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : जिल्ह्यातील विकास कामांसाठी निधी कमी पडू देणार नाही. मात्र प्राप्त झालेल्या निधीतून गुणवत्तापूर्ण विकासकामे करण्याकडे अधिकाऱ्यांनी विशेष लक्ष द्यावे, असे निर्देश पालकमंत्री तथा जिल्ह्याचे वने, वित्त व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले.
गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्रीपद स्वीकारल्यानंतर मुनगंटीवार यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन विभागाच्या सभागृहात शुक्रवारी विकासकामांचा आढावा घेतला. याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला जिल्हा परिषद अध्यक्ष योगीता भांडेकर, खासदार अशोक नेते, आमदार डॉ. होळी, आमदार कृष्णा गजबे, जिल्हाधिकारी शेखर सिंह, मुख्य कार्यपालन अधिकारी डॉ. विजय राठोड, जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, उपवनसंरक्षक कुमारस्वामी, सहायक जिल्हाधिकारी डॉ. इंदूराणी जाखड, गडचिरोलीच्या नगराध्यक्ष योगीता पिपरे, वडसाच्या नगराध्यक्ष शालू दंडवते, जिल्हा परिषद उपाध्यक्ष अजय कंकडालवार, जिल्हा नियोजन अधिकारी टी.एस. तिडके आदी मान्यवर उपस्थित होते.
आढावा सभेत जिल्हाधिकाºयांनी जिल्ह्यातील महत्त्वाच्या विभागातील रिक्त पदांची माहिती सादर केली. यावेळी पालकमंत्री मुनगंटीवार यांनी अत्यंत महत्त्वाची रिक्त पदे तातडीने भरावीत. पदे रिक्त राहिल्यास अडचण निर्माण होते. त्यामुळे रिक्त पदे भरण्यासाठी शासन प्रयत्न करेल, असे आश्वासन दिले.
रस्ता हा विकासाचा केंद्रबिंदू आहे. रस्ते बनविताना रस्त्यांची गुणवत्ता दर्जेदार असावी. कमीतकमी वेळेत ते कसे तयार होतील, याकडे लक्ष द्यावे. रस्त्यांची गुणवत्ता तपासण्याकरिता पथक तयार करण्यात येईल. कमी उंचीच्या पुलांमुळे पावसाळ्यात अतिदुर्गम भागातील रहदारी पूर्णपणे बंद होते. पुलाची उंची वाढविण्यास शासन निधी उपलब्ध करून देईल. दुर्गम भागात बांधकामाच्या निविदा कंत्राटदार भरत नाही. त्यामुळे विकासकामे होत नाही. ही बाब जिल्हाधिकाऱ्यांनी पालकमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली. यावर छत्तीसगडच्या धरतीवर जिल्हा निर्माण समिती तयार करून ही समस्या कमी करण्यासाठी पुढाकार घेतला जाईल. खत व बियाणांचा शेतकºयांना तुटवडा निर्माण होणार नाही, याकडे कृषी विभाग व इतर विभागाच्या अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.
तक्रार निवारण केंद्र स्थापन करणार
नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यात हॅलो चंद्रपूर तक्रार निवारण केंद्र तयार करण्यात आले. याच धरतीवर गडचिरोली जिल्ह्यातही हॅलो गडचिरोली तक्रार निवारण केंद्र स्थापन केले जाईल. या केंद्राच्या माध्यमातून नागरिकांच्या समस्या सोडविल्या जातील, असे आश्वासन पालकमंत्र्यांनी दिले.