शेतकऱ्यांचे गहाण सोने परत करा
By admin | Published: December 31, 2015 01:32 AM2015-12-31T01:32:57+5:302015-12-31T01:32:57+5:30
राज्य शासनाने शेतकऱ्यांच्या हितासाठी पावले उचलताना सावकारी पाशातून शेतकऱ्यांची मुक्तता व्हावी, याकरिता क्रांतिकारी निर्णय घेतला आहे.
तहसीलदारांना निवेदन : आरमोरी तालुका महिला काँग्रेसची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी
आरमोरी : राज्य शासनाने शेतकऱ्यांच्या हितासाठी पावले उचलताना सावकारी पाशातून शेतकऱ्यांची मुक्तता व्हावी, याकरिता क्रांतिकारी निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा सर्व शेतकऱ्यांना लाभ व्हावा या हेतूने ज्या शेतकऱ्यांनी सावकार व सोनाराकडे सोने गहाण ठेवलेले आहे ते सोने परत मिळवून द्यावे, याकरिता प्रशासनाने पुढाकार घ्यावा, अशी मागणी आरमोरी तालुका महिला काँग्रेसच्या वतीने तहसीलदारांमार्फत जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.
आरमोरी तालुक्यात मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांनी शेतीच्या कामासाठी सोने सोनार व सावकारांकडे गहाण ठेवले आहे. गहाण असलेले सोने शेतकऱ्यांना परत मिळावे व सावकारी पाशातून शेतकऱ्यांची सुटका व्हावी, या हेतूने सोने गहाण ठेवलेल्या शेतकऱ्यांच्या याद्या सहाय्यक निबंधकांकडे पाठविण्यास सांगण्यात आले होते. परंतु अनेकांनी हेतुपुरस्सर प्रत्येक गावातून एक ते दोनच शेतकऱ्यांचे नाव सहाय्यक निबंधकांकडे पाठविले. इतर शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून दिले. परिणामी शेतकऱ्यांवर मोठ्या प्रमाणावर अन्याय झाला आहे. शेतकरी पुन्हा सावकारी पाशात ओढला जात आहे. या योजनेच्या लाभातून वंचित शेतकऱ्यांची फेर चौकशी करून त्यांना ताबडतोब सदर लाभार्थ्यांच्या यादीत समाविष्ट करावे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडू, असा इशारा महिला काँग्रेसच्या वतीने देण्यात आला आहे. निवेदन देताना उपाध्यक्ष वृंदा गजभिये, दिलीप घोडाम, बाजीराव सयाम, दीपक दुपारे, गोविंदा पुसाम, उद्धव मैंद, दामोधर बारापात्रे, लालाजी मैंद, माणिक कुंभारे, प्रमोद लाडे, दामोधर कांदोर, उमेश कुमरे, तातीराम सयाम व पदाधिकारी हजर होते. (वार्ताहर)