लाभार्थ्यांना देयके तत्काळ द्या
By Admin | Published: July 9, 2016 01:37 AM2016-07-09T01:37:24+5:302016-07-09T01:37:24+5:30
सन २०१३-१४ ते २०१५-१६ या वर्षातील सर्व लाभार्थ्यांना वेळीच देयके अदा करून अधिकाधिक घरकूल विहित कालावधीत पूर्ण करावे,
जि. प. कृषी सभापतींच्या सूचना : मनरेगा व इंदिरा आवास योजनेचा अहेरीत आढावा
अहेरी : सन २०१३-१४ ते २०१५-१६ या वर्षातील सर्व लाभार्थ्यांना वेळीच देयके अदा करून अधिकाधिक घरकूल विहित कालावधीत पूर्ण करावे, अशा सूचना जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती अजय कंकडालवार यांनी शुक्रवारी दिल्या.
अहेरी पंचायत समिती अंतर्गत सुरु असलेल्या विविध योजनांविषयक कामाचा आढावा जिल्हा परिषद कृषी सभापती अजय कंकडालवार यांनी शुक्रवारी घेतला. पंचायत समिती अंतर्गत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना व इंदिरा आवास योजना तसेच विविध योजना अंतर्गत कामाचा आढावा घेऊन अधिकारी तथा कर्मचाऱ्यांना अपूर्ण असलेली कामे पूर्ण करण्याचे निर्देश दिले.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे कक्षप्रमुख किशोर वाळके यांनी मनरेगा अंतर्गत सन २०१५- १६ मधे झालेली कामे व खर्च, मनुष्य दिवस निर्मितीचे उद्दिष्टे व साध्य तसेच सन २०१६- १७ अंतर्गत सुरु असलेली कामे व त्यावर झालेला खर्च आदीची माहिती दिली. तसेच इंदिरा आवास योजना अंतर्गत घरकुलाचे वितरित केलेल्या देयकाबाबतची माहिती स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक दीपक नारदेलवार व भगवान नागरगोजे यांनी दिली.
या प्रसंगी सहायक गटविकास अधिकारी सुभाष चांदेकर, विस्तार अधिकारी चंदा नैताम, अशोक येलमुले इतर कर्मचारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
हजेरी पत्रकात मागणी नोंदवा
पावसाळा सुरू असल्याने मनरेगा अंतर्गत सध्या कामे बंद असून घरकुल लाभार्थ्यांची हजेरीपत्रक काढण्याच्या कामाबाबत जि. प. कृषी सभापतींनी समाधान व्यक्त केला. सन २०१५-१६ च्या ज्या लाभार्थ्यांनी ग्रामरोजगार सेवकांकडून हजेरीपत्रकाकरिता पंचायत समितीला मागणी नोंदवावी, असे आवाहनही जि. प. कृषी सभापती अजय कंकडालवार यांनी केले.