शेतकऱ्यांना बोनसची रक्कम अदा करा
By admin | Published: June 12, 2017 01:01 AM2017-06-12T01:01:41+5:302017-06-12T01:01:41+5:30
खरीप हंगामाला सुरूवात झालेली आहे. अनेक शेतकऱ्यांना बी- बियाणे, खते खरेदी करण्याकरिता व हंगाम खर्च
आनंदराव गेडाम यांची मागणी
लोकमत न्यूज नेटवर्क
कुरखेडा : खरीप हंगामाला सुरूवात झालेली आहे. अनेक शेतकऱ्यांना बी- बियाणे, खते खरेदी करण्याकरिता व हंगाम खर्च भागविण्याकरिता शेतकऱ्यांना रकमेची गरज आहे. त्यामुळे घोषित करण्यात आलेली शासकीय धान खरेदीवरील बोनसची रक्कम त्यांना तत्काळ अदा करावी, तसेच एका शेतकऱ्याला केवळ ५० क्विंटल धान विक्रीपर्यंतची बोनसची अट रद्द करून बोनसकरिता मर्यादा न करता सरसकट सर्वांना बोनसची रक्कम अदा करावी, अशी मागणी माजी आ. आनंदराव गेडाम यांनी शासनाकडे केली आहे.
मागील खरीप हंगामाच्या धान विक्रीला जवळपास चार ते सहा महिन्यांचा कालावधी उलटलेला आहे. मात्र शासनाने प्रति क्विंटल धान विक्रीवर घोषित केलेली २०० रूपयांची बोनसची रक्कम अद्याप शेतकऱ्यांना वितरित केली नाही. तसेच शेतकऱ्यांकडून महामंडळाच्या धान केंद्रावर खरेदी करण्यात आलेल्या खाली बारदान्याची प्रति बारदाना १५ रूपये प्रमाणे ठरविण्यात आलेली रक्कम अदा केलेली नाही. बोनसची रक्कम अदा करताना शेतकऱ्यांना केवळ ५० क्विंटलपर्यंत धान विक्रीवर बोनस अदा करण्याची तरतूद आहे. त्यामुळे मोठ्या शेतकऱ्यांवर अन्याय होणार आहे. विक्री करण्यात आलेल्या सर्व शेतकऱ्यांच्या संपूर्ण धानावर बोनस अदा करण्यात यावा व सुरू असलेल्या खरीप हंगामाच्या नियोजनात ही रक्कम कामी यावी, याकरिता तत्काळ बोनसची रक्कम अदा करावी, अशी मागणी माजी आ. आनंदराव गेडाम यांनी शासनाकडे केली आहे.