निकृष्ट बंधाऱ्याची पूर्ण रक्कम अदा

By admin | Published: June 12, 2016 01:14 AM2016-06-12T01:14:39+5:302016-06-12T01:14:39+5:30

जिल्हा परिषद सिंचाई उपविभाग या विभागाकडून चंदनवेली येथे आदिवासी उपयोजनेंतर्गत जलशिवार योजना पाणी साठवण बंधारा बांधण्यात आला.

Pay the full amount of the damaged bond | निकृष्ट बंधाऱ्याची पूर्ण रक्कम अदा

निकृष्ट बंधाऱ्याची पूर्ण रक्कम अदा

Next

चंदनवेली येथील बंधारा : ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष
एटापल्ली : जिल्हा परिषद सिंचाई उपविभाग या विभागाकडून चंदनवेली येथे आदिवासी उपयोजनेंतर्गत जलशिवार योजना पाणी साठवण बंधारा बांधण्यात आला. या बंधाऱ्याचे बांधकाम निकृष्ठ आहे. त्यामुळे क्वालिटी कंट्रोल विभागाकडून याची चौकशी करावी, अशी मागणी दीपक वैद्य यांनी केली आहे.
चंदनवेली येथे बंधारा बांधकामासाठी १५ लाख रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. या निधीतून बंधाऱ्याचे बांधकाम केले जात होते. बंधारा बांधताना ४० एमएम गिट्टी बाहेरून बोलावून ती वापरणे आवश्यक असताना कंत्राटदाराने ४० एमएम गिट्टी न वापरता बंधाऱ्याच्या आजुबाजुचे दगड जमा केले. ते खोदून बंधाऱ्याच्या बांधकामासाठी गिट्टी वापरली, असा आरोप दीपक वैद्य यांनी केला आहे. बंधाऱ्याचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर पाणी साठवून राहण्याकरिता गेट लावणे आवश्यक असते. तसेच हा गेट लावल्यानंतरच बांधकामाचा पूर्ण बिल काढणे आवश्यक असताना लोखंडी गेट न लावताच पूर्ण बिल देण्यात आले आहे. त्यामुळे या कामात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाला आहे. १५ लाख रूपयांच्या निधीपैकी प्रत्यक्ष पाच लाख रूपये सुध्दा खर्च झाले नसावेत, असा आरोप सुध्दा वैद्य यांनी केला आहे. यासाठी दोषी असलेल्या ग्रामसेवकावर कारवाई करावी, अशी मागणी दीपक वैद्य यांनी संवर्ग विकास अधिकारी यांना दिलेल्या तक्रारीतून केली आहे. बंधाऱ्याचे बांधकाम ग्रामपंचायतीच्या नियंत्रणाखाली करण्यात येत आहे. त्यामुळे बांधकामाच्या गुणवत्तेवर नियंत्रण ठेवणे ही ग्रामपंचायतीची जबाबदारी आहे. मात्र ग्रामपंचायतीने स्वत: काम न करता ठेकेदाराला काम दिले. त्याच्यावरही नियंत्रण ठेवले नाही. त्यामुळे बंधारा निकृष्ठ दर्जाचा बांधण्यात आला. असाच प्रकार अनेक ठिकाणी झाला असून चंदनवेलीच्या कामात मोठा गैरव्यवहार झाला असून बांधकामाची चौकशी करण्याची मागणी दीपक वैद्य यांनी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)

मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी भेट देऊन तपासणी करावी
जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या लघु सिंचन विभागाच्या मार्फतीने जिल्हाभर तलाव, बोड्या खोदकाम, दुरूस्ती तसेच बंधारे बांधणे आदी कामे अहेरी उपविभागात मोठ्या प्रमाणावर करण्यात आले आहेत. राजकीय लोकांशी संबंध असलेले कंत्राटदार हे काम करीत आहेत. दुर्गम व अतिदुर्गम भागात थातूरमातूर काम केली आहेत. भामरागड, एटापल्ली, अहेरी, मुलचेरा, सिरोंचा आदी तालुक्यात असा प्रकार झाला आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी शंतनू गोयल यांनी अकस्मात भेटी देऊन या सर्व कामांची पावसापूर्वी पाहणी करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे.

ग्रामसेवकाचा प्रतिक्रिया देण्यास नकार
बंधारा बांधकामाच्या गुणवत्तेवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी ग्रामपंचायतीची आहे. त्यामुळे निकृष्ठ दर्जाच्या बंधाराबाबत गेदा ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक ई. एस. नारा यांना विचारणा केली असता, बंधाऱ्याच्या बांधकामाबाबत त्यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. यावरून बांधकामात घोळ असल्याचे स्पष्ट होत आहे.

Web Title: Pay the full amount of the damaged bond

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.