शिक्षकांचे वेतन एसजीएसपीद्वारे द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2019 10:33 PM2019-03-18T22:33:53+5:302019-03-18T22:34:41+5:30
स्टेट बँकेने कर्मचारी वर्गासाठी एसजीएसपी अकाऊंट (स्टेट गव्हर्नमेंट सॅलरी पॅकेज) सुरू केले आहे. या खात्याद्वारे कर्मचारी वर्गाला अनेक सवलती लागू केल्या आहेत. शिक्षकांचे वेतन याच खात्याद्वारे करण्यासाठी सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषद उपाध्यक्ष अजय कंकडालवार व प्राथमिक शिक्षणाधिकारी राघवेंद्र मुनघाटे यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : स्टेट बँकेने कर्मचारी वर्गासाठी एसजीएसपी अकाऊंट (स्टेट गव्हर्नमेंट सॅलरी पॅकेज) सुरू केले आहे. या खात्याद्वारे कर्मचारी वर्गाला अनेक सवलती लागू केल्या आहेत. शिक्षकांचे वेतन याच खात्याद्वारे करण्यासाठी सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषद उपाध्यक्ष अजय कंकडालवार व प्राथमिक शिक्षणाधिकारी राघवेंद्र मुनघाटे यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
सद्य:स्थितीत प्राथमिक शिक्षकांचे वेतन जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतून होते. मात्र कर्मचाऱ्यांना कोणत्याही विशेष सवलती दिल्या जात नाही. स्टेट बँक आॅफ इंडियाने एसजीएसपी हा कर्मचारी वर्गासाठी सुरू केलेला नवीन खात्याचा प्रकार आहे. या खात्यांच्या सभासदांना स्टेट बँक आॅफ इंडियाद्वारे विविध सवलती लागू केल्या जातात. त्यामुळे राज्यभरातील कर्मचारी व शिक्षक या खात्याकडे आकर्षित होत चालले आहेत. राज्यातील काही जिल्हा परिषदांनी प्राथमिक शिक्षकांचे वेतन या खात्यातून करण्याचा सकारात्मक निर्णय घेतला आहे. याची अंमलबजावणी गडचिरोली जिल्ह्यातही करावी, अशी मागणी निवेदनातून केली आहे. या मुख्य मागणीबरोबरच १ नोव्हेंबर २००५ रोजी नंतर नियुक्त प्राथमिक शिक्षकांचे अंशदायी परिभाषीत निवृत्ती वेतन योजनेंतर्गत कपात झालेल्या हिशोबाचे विवरणपत्र द्यावे, मयत शिक्षकांचे डीसीपीएस अंतर्गत झालेल्या कपातीच्या परताव्याचे प्रस्ताव मंजुरीकरिता पाठवावे, १२ वर्ष झालेल्या संपूर्ण शिक्षकांना वरिष्ठ वेतन श्रेणी लागू करण्याच्या प्रस्ताव पाठवाव्या, आदी मागण्यांचा समावेश आहे.
निवेदन देतेवेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष गुरूदेव नवघडे, उपाध्यक्ष अंकूश मैलारे, सरचिटणीस बापू मुनघाटे, वनश्री जाधव, गणेश आखाडे, दीपक सुरपाम, प्रशांत ठेंगरी, राजू सोनटक्के, निलकंठ शेंडे, प्रवीण धाडसे, गोरखनाथ तांदळे, अमित टेंभुर्णे, योगेश दमकोंडावार, विनोद रायपुरे, विश्वनाथ सोनटक्के, निकेश बन्सोड, किसन सोनुले, उमेश जेंगठे, निलेश कोडापे, खुमेंद्र मेश्राम, अंकूश मेश्राम आदी उपस्थित होते.
काय आहेत एसजीएसपी खात्याचे फायदे?
एसजीएसपीच्या खात्यात शुन्य शिल्लक असले तरी कोणतेही शुल्क लागत नाही. वेतनश्रेणीनुसार खात्याचे सिल्वर, गोल्ड, डायमंड, प्लाटिनम असे चार प्रकार पडले आहेत. कोणत्याही बँकेच्या एटीएममधून कितीवेळा पैसे काढले तरी शुल्क लागत नाही. मागणीनुसार क्रेडीट कार्ड उपलब्ध होतो. २० लाख रुपये पर्यंत अपघाती विम्याचे संरक्षण मिळते. विमान अपघाताचा ३० लाख रुपयांपर्यंतचा संरक्षण मिळते. वैयक्तिक कर्ज, कार, घर व शैक्षणिक कर्ज घेतल्यास व्याज दरात सुट मिळते. बँकेत लॉकर चार्जेसमध्ये २५ टक्के सुट आहे. कर्मचाºयास दोन महिन्याच्या पगाराऐवढी ओव्हरड्राफ्ट देण्याची सुविधा आहे.