तेंदुपत्ता तोडाई व संकलनाची मजूरी द्या हो! आदिवासींचा आर्त टाहो...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2020 12:58 PM2020-07-16T12:58:28+5:302020-07-16T12:59:07+5:30
कंत्राटदारांनी बोदभराई करून सर्वच तेंदुपत्ता घेऊन गेला.मात्र २८ गावांतील तेंदुपत्ता तोडाई करून संकलन करणाऱ्या नागरिकांना त्यांची रक्कम अजूनही मिळालेली नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली: भामरागड तालुक्यातील मन्नेराजाराम, ईरकडुम्मे, पल्ली, येचली व मडवेली ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या २८ गावांतील तेंदुपत्ता तोडाई व संकलनाची मजूरी पावसाळ्याला सुरुवात झाली तरी अजूनही मिळाली नाही. त्यामुळे तेंदुपत्ता तोडाईची व संकलनाची मजूरी द्या हो, असा आर्त टाहो आदिवासी बांधवांनी फोडला आहे.
पत्रकार परिषदेत आपली व्यथा मांडताना आदिवासी बांधवांनी सांगितले की, तेंदुपत्ता हंगाम मे २०२० मध्ये ग्रामसभेद्वारे ग्रामपंचायत मन्नेराजाराम, ईरकडुम्मे, पल्ली व मडवेली येथील ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या २८ गावांनी तेंदुपत्ता कंत्राटदार यांचेशी ४००रुपये प्रतिशेकडा व रॉयल्टी ४०० रुपये प्रतिशेकडा प्रमाणे दर ठरवून करारनामा केला. यावर्षी कोविड-१९ महामारीच्या प्रादुभार्वामुळे सर्वत्र टाळेबंदी व जमावबंदी लागू करण्यात आली. त्यामुळे तेंदुपत्ता लिलाव प्रक्रिया पार पाडणे शक्य झाले नाही. ग्रामसभांनी परस्पर स्वत: ठरवून कंत्राटदाराशी करारनामा करून घेतला. कंत्राटदारांनी बोदभराई करून सर्वच तेंदुपत्ता घेऊन गेला.मात्र २८ गावांतील तेंदुपत्ता तोडाई करून संकलन करणाऱ्या नागरिकांना त्यांची रक्कम अजूनही मिळालेली नाही. तद्वतच फडीमुन्शी, मदतनिस, बोदभराई, पाणी मारणे, पलटाई इत्यादी कामांची मजूरी सुद्धा मिळालेली नाही.
तेंदुपत्ता हंगाम हा येथील बहुसंख्य आदिवासी व इतरही नागरिकांसाठी आनंदाची आर्थिक पर्वणीच असते. संपूर्ण वर्षांचा आर्थिक बजेट तेंदुपत्ता हंगामावरच अवलंबून असते. येथील लोकांचा मुख्य उपजिविकेचा साधन म्हणजे तेंदुपत्ता संकलन करुन विक्री करणे हाच आहे. याच पैशातून लोकांचे घर चालते. मुलांचे शिक्षण, औषधी, कपडेलत्ते, शेतीसाठी लागणारे बि-बियाणे, अवजारे व खत इत्यादींसाठी याच पैशावर अवलंबून राहावे लागते. मात्र यावर्षी पावसाळा सुरू झाला तरी तेंदुपत्ता तोडाई व संकलनाचे पैसे अजूनही मिळाले नसल्याने येथील आदिवासी चिंतेत आहे. आता शेती कशी करायची याच विवंचनेत असतांनाच कुटुंब चालविण्याची चिंताही त्यांना लागली आहे. कोरोना महामारी मुळे रोजगारही उपलब्ध नाही, त्यामुळे जीवन कसे जगावे?असा यक्षप्रश्न त्यांच्यापुढे उभा ठाकला आहे.