पानठेलाधारकांनी पर्यायी व्यवसाय करावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2018 01:12 AM2018-11-01T01:12:39+5:302018-11-01T01:13:56+5:30
मेक इन गडचिरोली प्रकल्पाच्या माध्यमातून लोकांना रोजगार मिळवून देण्याचा आपला प्रयत्न सुरू आहे. तंबाखू विक्रीच्या व्यवसायात भविष्य नाही. याला पर्याय म्हणून इतर व्यवसायाकडे वळून आपली भविष्यातील पिढी तंबाखूच्या आहारी जाणार नाही, याकरिता काळजी घेतली पाहिजे,
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : मेक इन गडचिरोली प्रकल्पाच्या माध्यमातून लोकांना रोजगार मिळवून देण्याचा आपला प्रयत्न सुरू आहे. तंबाखू विक्रीच्या व्यवसायात भविष्य नाही. याला पर्याय म्हणून इतर व्यवसायाकडे वळून आपली भविष्यातील पिढी तंबाखूच्या आहारी जाणार नाही, याकरिता काळजी घेतली पाहिजे, पानठेलाधारकांनी मुद्रा लोन घेऊन पर्यायी व्यवसाय करावा, असे आवाहन आ.डॉ.देवराव होळी यांनी केले.
राष्ट्रीयतंबाखू नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत जिल्हा सामान्य रुग्णालय, नगर परिषद आणि अन्न व औषध प्रशासन गडचिरोलीच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी स्थानिक गोंडवाना कलादालनात गडचिरोली शहरातील पानठेलाधारक व तंबाखू विक्रेत्यांसाठी एकदिवसीय कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते.
यावेळी मंचावर पालिकेचे मुख्याधिकारी संजीव ओहोळ, जिल्हा उद्योग केंद्राचे भोंबे, डॉ.नंदू मेश्राम, मत्स्य विकास अधिकारी किरण वाघमारे आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना आ.डॉ.देवराव होळी म्हणाले, पानठेलाधारकांवर आपण अन्याय होऊ देणार नाही, त्यांच्या पाठीशी पूर्ण ताकदीनिशी राहणार, अशी ग्वाही त्यांनी दिली. तंबाखू मुक्तीच्या कार्यासाठी पानठेलाधारकांनी पालिका प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन करीत भविष्यात पानठेलाधारकांना पर्यायी उपजीविकेचे साधन कशा पद्धतीने मिळवून देता येईल, यासाठी प्रयत्न केले जातील, असे मुख्याधिकारी संजीव ओहोळ यांनी यावेळी सांगितले. कौशल्य व्यवस्थापक गणेश ठाकरे यांनी राष्टÑीय नागरी उपजीविका अभियानांतर्गत कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देऊन रोजगार मिळवून देण्यासाठी न.प.च्या माध्यमातून प्रयत्न सुरू असल्याचे यावेळी सांगितले.
बिज भांडवल पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रमाबाबत भोंबे यांनी मार्गदर्शन केले. शेती व्यवसायाला पुरक व्यवसाय म्हणून मत्स्य व्यवसाय उभारून आर्थिक उत्पन्न मिळविता येते, त्यासाठी नागरिकांनी मत्स्य व्यवसायाकडे वळावे, असे आवाहन मत्स्य विकास अधिकारी किरण वाघमारे यांनी यावेळी केले. डॉ.नंदू मेश्राम यांनी प्रास्ताविकातून तंबाखूचे दुष्परिणाम सांगितले. संचालन गणेश नाईक यांनी तर आभार गणेश ठाकरे यांनी मानले.