अहिंसा रॅलीतून दिला शांततेचा संदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2019 06:00 AM2019-10-03T06:00:00+5:302019-10-03T06:00:29+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या १५० व्या आणि लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त बुधवारी (दि.२) गडचिरोलीत ...

Peace message delivered from non-violence rally | अहिंसा रॅलीतून दिला शांततेचा संदेश

अहिंसा रॅलीतून दिला शांततेचा संदेश

Next
ठळक मुद्देबुलेटचे उत्तर बॅलेटने द्या -जिल्हाधिकारी : नक्षलग्रस्त कुटुंबातील सदस्यांचा ‘शांतीदूत’ म्हणून सन्मान

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या १५० व्या आणि लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त बुधवारी (दि.२) गडचिरोलीत पोलीस विभागाच्या वतीने भव्य अहिंसा रॅली काढण्यात आली. यात विविध सामाजिक संघटनांसह शाळकरी विद्यार्थी आणि अधिकारी-कर्मचारी सहभागी झाले होते. यावेळी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी लोकसभा निवडणुकीप्रमाणे विधानसभा निवडणुकीतही भयमुक्त वातावरणात मतदानाचे कर्तव्य पार पाडावे, आणि नक्षलवाद्यांच्या बुलेटचे उत्तर बॅलेटमधून द्यावे, असे आवाहन नागरिकांना केले.
शहरातील इंदिरा गांधी चौकात सकाळी ८ वाजता झालेल्या या कार्यक्रमाला जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.विजय राठोड, अपर पोलीस अधीक्षक मोहीतकुमार गर्ग, सहायक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी डॉ.इंदुराणी जाखड, उपजिल्हा निवडणूक अधिकारी कल्पना नीळ-ठुबे यांच्यासह अनेक अधिकारी उपस्थित होते.
यावेळी कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता निर्भयपणे मतदान करण्याची शपथ उपस्थितांना देण्यात आली. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी हिरवा झेंडा दाखवत रॅलीला सुरूवात केली. ही रॅली इंदिरा गांधी चौक, बाजार स्थळ, सराफा लाईन, गांधी चौक मार्गे पुन्हा इंदिरा गांधी चौकात आली. यावेळी सहभागी नागरिक आणि विद्यार्थ्यांच्या हातात शांततेचा संदेश देणारे आणि नक्षलविरोधी फलक झळकत होते. या कार्यक्र मात ३ हजारांवर विद्यार्थ्यांसह शहीदांच्या वीरपत्नी, वीरमाता, लोकमत सखी मंचच्या महिला सदस्य तथा आत्मसमर्पित नक्षलवादी सहभागी झाले होते. कार्यक्रमाचे संचालन पोलीस विभागाचे जनसंपर्क अधिकारी पो.उपनिरीक्षक प्रशांत दिवटे आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी कृष्णा रेड्डी यांनी केले. यावेळी विविध घोषणा देत नक्षली कृत्यांचा निषेध नोंदविण्यात आला.

आदिवासींचा छळ थांबवा
शांतता रॅलीची सुरु वात करण्यापूर्वी बोटेझरी या गावी नक्षली हिंसाचाराचे बळी ठरलेले शिक्षक युगेंद्र मेश्राम आणि इरपनार येथील सुशिक्षित बेरोजगार बबिता मडावी यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी मेश्राम यांचे वडील ऋषी मेश्राम आणि बबिताची बहीण सुनीता यांना ‘शांतीदूत’ म्हणून घोषित करून त्यांचा अहिंसेचे प्रतिक असलेला चरखा भेट देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी मनोगत व्यक्त करताना सुनीता हिने आदिवासींचा छळ थांबवण्याचे आवाहन नक्षलवाद्यांना उद्देशून केले. तसेच ऋषी मेश्राम यांनीही नक्षलवाद्यांनी कोणताही दोष नसताना आपल्या मुलाचा बळी घेणाºया नक्षलवाद्यांचा निषेध नोंदविला.

Web Title: Peace message delivered from non-violence rally

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.