जिल्हा रुग्णालयात सुविधांची ऐसीतैसी! रुग्णांवर नाक दाबून उपचार घेण्याची वेळ
By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2023 12:03 PM2023-09-12T12:03:25+5:302023-09-12T12:06:05+5:30
छताला गळती, खाटाखालूनही वाहतेय पाणी
गडचिरोली : कोट्यवधी रुपयांच्या गैरव्यवहाराच्या आरोपांनी चर्चेत असलेल्या जिल्हा रुग्णालयात सध्या रुग्णांवर नाक दाबून उपचार घेण्याची वेळ आली आहे. त्याला कारण आहे स्वच्छतागृहात साचलेली घाण व अस्वच्छता. छताला गळती लागली असून, खाटाखालूनही पाणी वाहत आहे. त्यामुळे रुग्णांमधून रोष व्यक्त होत आहे.
तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सकांच्या काळात कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी करुन साहित्य खरेदी तसेच विकासकामे करण्यात आली, परंतु ती वादात अडकली आहेत. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सत्ताधाऱ्यांनी केलेल्या विकासकामांचा दावा खोडून काढत जिल्हा रुग्णालयात तीनशे कोटींपर्यंत गैरव्यवहार झाल्याचा आरोप केल्याने खळबळ उडाली आहे. अशातच आता जिल्हा रुग्णालयातील विदारक परिस्थिती समोर आली आहे. वॉर्डात छतातून पाणी ठिबकत असून, काही ठिकाणी विद्युतपुरवठा करणारे वायर उघडे आहेत. शौचालयात घाणच घाण पसरली आहे. काही ठिकाणी पाणी तुंबलेले आहे. त्यामुळे दुर्गंधी पसरली आहे. सध्या जलजन्य आजारांनी डोके वर काढल्याने रुग्णसंख्या वाढलेली आहे, पण सामान्य व गरजू रुग्णांची उपचार घेताना परवड होत असल्याचे चित्र आहे.
अधिकाऱ्यांच्या दालनावर उधळपट्टी, वॉर्डात असुविधा
दरम्यान, वर्षभरापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हा रुग्णालयात अत्याधुनिक अतिदक्षता विभागाचे उद्घाटन केले होते. काही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कक्षातही लाखोंची उधळपट्टी करून अत्याधुनिकीकरण केले होते. मात्र, उर्वरित वाॅर्डांच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष करण्यात आले. परिणामी रुग्णांची हेळसांड होत असल्याचे दिसून येत आहे.
वॉर्डांच्या दुरुस्तीचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सुरू आहे. काम वेगाने करून असुविधा दूर करावी यासाठी बांधकाम विभागाला अनेकदा पत्रव्यवहार केला आहे. कामे दर्जेदार करावीत, अशी विनंती केली आहे. असुविधा दूर करून रुग्णांना अधिक चांगल्या सेवा देण्याचा प्रयत्न आहे.
- डॉ. प्रमोद खंडाते, जिल्हा शल्यचिकित्सक