ओबीसी आरक्षणासाठी शेकापचा चक्काजाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2018 12:43 AM2018-11-29T00:43:29+5:302018-11-29T00:43:53+5:30
गडचिरोली जिल्ह्यात इतर मागासवर्गीयांचे आरक्षण १९ वरून ६ टक्के केले ते पूर्ववत १९ टक्के करावे या प्रमुख मागणीसह धानाला ३५०० रुपये हमीभाव आणि इतर स्थानिक मागण्यांसाठी शेतकरी कामगार पक्षाने (शेकाप) बुधवारी जिल्हा मुख्यालयासह गडचिरोली विधानसभा मतदार संघात ११ ठिकाणी चक्काजाम आंदोलन केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात इतर मागासवर्गीयांचे आरक्षण १९ वरून ६ टक्के केले ते पूर्ववत १९ टक्के करावे या प्रमुख मागणीसह धानाला ३५०० रुपये हमीभाव आणि इतर स्थानिक मागण्यांसाठी शेतकरी कामगार पक्षाने (शेकाप) बुधवारी जिल्हा मुख्यालयासह गडचिरोली विधानसभा मतदार संघात ११ ठिकाणी चक्काजाम आंदोलन केले. यावेळी पोलिसांनी शेकडो कार्यकर्त्यांना स्थानबद्ध करून नंतर त्यांची सुटका केली.
शेकापचे जिल्हा चिटणीस रामदास जराते, महिला नेत्या जयश्री येळदा, पुरोगामी महिला संघटनेच्या जिल्हा सरचिटणीस अर्चना चुधरी, गडचिरोली तालुका चिटणीस सुधाकर आभारे, श्रीधर मेश्राम, श्यामसुंदर उराडे यांच्या नेतृत्वात जिल्ह्यातील हे आंदोलन करण्यात आले.
गडचिरोली शहरात इंदिरा गांधी चौकात दुपारी १२ वाजताच्या सुमारास शेकापच्या कार्यकर्त्यांनी जमून घोषणाबाजी केली. त्यानंतर चारही मार्गावरील वाहतूक रोखून धरली. यामुळे अनेक वाहने खोळंबली होती. दरम्यान पोलिसांनी सर्व आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात स्थानबद्ध केले.
गडचिरोली शहरातील आंदोलनापूर्वी काही ठिकाणी सकाळी ९ पासूनच चक्काजाम आंदोलन करण्यात आले. त्यात नागपूर मार्गावरील पोर्ला येथे युवा कार्यकर्ते होमराज उपासे यांच्या नेतृत्वात मंगेश भानारकर, विकास झोडगे, रविंद्र येमगेलवार इतर कार्यकर्त्यांनी, याच मार्गावर नगरी येथे शेकापचे आरमोरी विधानसभा चिटणीस रोहीदास कुमरे, माजी सरपंच मोरेश्वर बांबोळे यांच्या नेतृत्वात जवळपास तासभर आंदोलन झाले.
चामोर्शी-मूल मार्गावर रमेश चौखुंडे, दुर्वास म्हशाखेत्री यांच्या नेतृत्वात भेंडाळा येथे सगणापूर, रामाळा, घारगाव, एकोडी, दोटकुली या परिसरातील गावातील कार्यकर्त्यांनी जमून चक्काजाम आंदोलन केले. आष्टी येथे पुरोगामी विद्यार्थी संघटनेचे जिल्हा चिटणीस अक्षय कोसनकर यांच्या नेतृत्वात तर अनखोडा येथे प्रेम कोसनकर यांच्या नेतृत्वात आंदोलन झाले. चामोर्शी येथील मुख्य मार्गावर हत्ती गेटजवळ शेकापचे तालुका चिटणीस दिनेश चुधरी, प्रकाश सहारे अनेक नागरिक या आंदोलनात सहभागी झाले होते.
कुनघाडा रै. येथील बस स्थानकावर शेकापचे विधानसभा चिटणीस नरेश मेश्राम, विठ्ठल दुधबळे यांच्या नेतृत्वात बैलबंड्या आडव्या करून चक्काजाम करण्यात आला. यावेळी चामोर्शीचे तहसीलदार बावणे यांनी घटनास्थळी भेट देऊन सदर मागण्या जिल्हा प्रशासनाला कळविण्यात येईल असे आश्वासन दिले.
गडचिरोली-चामोर्शी मार्गावरील शिवणी येथे शेकापचे जिल्हा सहचिटणीस वसंत गावतुरे, ओबीसी जागृती अभियानाचे जिल्हा समन्वयक दिनेश बोरकुटे, शेकापचे दत्तू चौधरी यांच्या नेतृत्वात आंदोलन झाले. याशिवाय पोटेगाव मार्गावर गुरवळा येथे शेकापचे जिल्हा सदस्य प्रकाश मंटकवार, तालुका सदस्य चंद्रकांत भोयर यांच्या नेतृत्वात जवळपास ३ तास आंदोलन चालले. विश्रामपूर येथे भिकारमौशी, मरेगाव, कळमटोला, बाम्हणी, आंबेटोला, उसेगाव, बोदली, मेंढा येथील नागरिकांनी सर्कल चिटणीस रोशन नरुले यांच्या नेतृत्वात गडचिरोली-धानोरा मार्ग रोखण्यात आला. याशिवाय जांभळी येथे चातगाव-कारवाफा सर्कल चिटणीस वसंत लोहट यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले.
अशा आहेत मागण्या
जिल्ह्यातील ओबीसींचे आरक्षण पूर्ववत १९ टक्के करावे, धानाला ३५०० रुपये हमीभाव द्यावा, ढिवर समाजाला मामा तलाव, बोडीतील मासेमारीचे पारंपरिक मालकी हक्क देण्यात यावे, शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी व कर्जपुरवठा करण्यात यावा, गडचिरोली जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करावा.