जिल्ह्यात कांजण्यांची साथ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2019 12:53 AM2019-02-25T00:53:27+5:302019-02-25T00:55:41+5:30
जिल्हाभरात कांजण्यांची साथ पसरली असून हजारो बालकांना याची लागण झाली आहे. कांजण्याला इंग्रजीमध्ये चिकन पॉक्स असे संबोधले जाते. हा एक सामान्यपणे पसरणारा संसर्गजन्य आजार आहे. लहान मुलांना या रोगाची लागण सर्वाधिक होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : जिल्हाभरात कांजण्यांची साथ पसरली असून हजारो बालकांना याची लागण झाली आहे.
कांजण्याला इंग्रजीमध्ये चिकन पॉक्स असे संबोधले जाते. हा एक सामान्यपणे पसरणारा संसर्गजन्य आजार आहे. लहान मुलांना या रोगाची लागण सर्वाधिक होते. त्याचबरोबर युवक व वयोवृध्दांनाही या रोगाची लागण होते. जानेवारी महिन्यापासून जिल्ह्यात काजण्याची साथ पसरली आहे. हजारो बालकांना कांजण्याची लागण झाली आहे. कांजण्या झाल्यानंतर संबंधित विद्यार्थ्याला शाळेत पाठविले जात नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांची शाळेतील पटसंख्याही घसरली आहे. रूग्णाशी प्रत्यक्ष संपर्क येणे किंवा हवेमधून काजण्या प्रसार होतो. संसर्ग झाल्यानंतर विषाणूंचा प्रभाव १० ते २१ दिवस राहतो. अंगावर पुरळ येण्यापासून ते पुरळ्यांची खपली निघेपर्यंत रूग्ण विषाणूचा वाहक असतो. पुरळ येऊन खपल्या निघेपर्यंत जवळपास सात दिवस लागतात.
कांजण्या हा एक सामान्य आजार आहे. कांजण्या झाल्यानंतर ताप येतो. १२ ते २४ तासांमध्ये पुरळांवर खाज सुटते. पुरळ पाण्याने भरतात. दोन ते पाच दिवसांमध्ये त्यांच्या संख्येत वाढ होते. त्वचेवर जुन्या पुरळांबरोबर नवीन पुरळेही येतच राहतात. कधी कधी शरीराच्या सर्व त्वचेवर पुरळ उठतात. काही रूग्णांमध्ये तोंडाच्या आतील बाजूस नाकामध्ये, कानामध्ये सुध्दा पुरळ येतात. जवळपास २५० ते ५०० पुरळ येणे सर्वसामान्य मानले जाते.
कांजण्या हा संसर्गजन्य रोग असल्याने याची लागण झालेल्या बालकाला शाळेमध्ये पाठवू नये, अन्यथा इतर बालकांनाही संसर्ग होण्याची शक्यता राहते. काजण्यासाठी अॅन्टीबायोटिक औषधी दिली जाते. ही औषधी जिल्ह्यातील सर्वच सरकारी रूग्णालयांमध्ये उपलब्ध आहे. काजण्या झाल्यानंतर डॉक्टरांकडून उपचार करून घ्यावा. पुरळ झाल्यानंतर जंतूसंसर्ग होणार नाही, यासाठी अॅन्टीबायोटिक औषधी घेणे आवश्यक आहे. कांजण्या झाल्यानंतर बालकाला ताप सुध्दा येत असल्याने पालकांनी मुलाला धीर द्यावा.
- डॉ. सुनील मडावी, जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी, गडचिरोली