चामोर्शीच्या आमसभेत विहिरींच्या अनुदानासाठी शेतकऱ्यांची ओरड
By admin | Published: April 14, 2017 01:05 AM2017-04-14T01:05:55+5:302017-04-14T01:05:55+5:30
तालुक्यातील ग्रामीण भागातील अनेक शेतकऱ्यांनी सिंचन विहिरींचे काम हाती घेतले आहे.
चामोर्शी : तालुक्यातील ग्रामीण भागातील अनेक शेतकऱ्यांनी सिंचन विहिरींचे काम हाती घेतले आहे. अनेकांनी स्वत:चे पैसे खर्च करून विहिरींचे बांधकाम केले; मात्र अजूनपर्यंत अनुदान प्राप्त झाले नाही. दुकानदार शेतकऱ्यांना त्रस्त देत आहेत. सिंचन विहिरींचे अनुदान तत्काळ देण्यासाठी प्रशासनाने पाऊल उचलावे, अशी मागणी तालुक्यातील सिंचन विहिरींच्या लाभार्थ्यांनी चामोर्शी पंचायती समितीच्या आमसभेत केली आहे.
पंचायत समितीची आमसभा गुरूवारी आमदार डॉ. देवराव होळी यांच्या अध्यक्षतेखाली गुरूवारी पार पडली. या सभेला जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष योगीता भांडेकर, पंचायत समिती सभापती आनंद भांडेकर, उपसभापती आकुली बिश्वास, तहसीलदार एस. के. बावणे, संवर्ग विकास अधिकारी गोविंद खामकर, जि.प. सदस्य रमेश बारसागडे, नामदेव सोनटक्के, शिल्पा रॉय, कविता भगत, विद्या आभारे, रंजीता कोडापे, रूपाली पंदिलवार, पं.स. सदस्य भाऊराव डोर्लीकर, विनोद मडावी, सुरेश कामेलवार, सुभाष वासेकर, संगीता भोयर, रेखा नरोटे, चंद्रकला आत्राम, उषा सातपुते, प्रिती बिश्वास, वंदना गौरकार, विष्णू ढाली, धर्मशीला सहारे, भाग्यश्री चिंतलवार, माधव परसोडे, शिवराम कोसरे, शंकर आक्रेड्डीवार, माजी पं.स. सभापती शशीबाई चिळंगे, माजी उपसभापती मंदा दुधबावरे, प्र.सो. गुंडावार, स्वप्नील वरघंटे, रोशनी वरघंटे, यशवंत लाड, माजी पं.स. उपसभापती केशव भांडेकर, तालुका भाजपा अध्यक्ष दिलीप चलाख, विस्तार अधिकारी भैय्याजी मुद्देमवार, भोगे तालुक्यातील सरपंच, उपसरपंच, विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. माजी जि.प. सदस्य स्वप्नील वरघंटे यांनी आमसभेची नोटीस सर्व सदस्यांना सात दिवसांच्या अगोदर मिळायला पाहिजे होती. हा मुद्दा उपस्थित केला. यशवंत लाड यांनी मुरखळा माल येथील अतिक्रमणाचा मुद्दा उपस्थित करून संबंधित अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. २००५ नंतरचे अतिक्रमण काढण्याचा शासनाचा निर्णय आहे. सात दिवसांच्या आत अतिक्रमण काढून अहवाल सादर करण्याचे निर्देश आमदारांनी दिले. दिलीप वनकर यांनी नवेगाव माल येथे प्रोजेक्टर खरेदी अंतर्गत झालेल्या भ्रष्टाचाराच्या चौकशीची मागणी केली. केशव खोबरागडे व विद्याधर सांगळे यांच्यासह १४ गावातील शेतकऱ्यांनी सिंचन विहिरीचे अनुदान देण्याची मागणी केली. अनखोडा-भेंडाळा रस्ता नादुरूस्त असल्याची बाब पं.स.सदस्य कोसरे यांनी लक्षात आणून दिली. दिगांबर धानोरकर यांनी २०१४ च्या शासन निर्णयाप्रमाणे सरपंच, सदस्य यांना मानधन देण्यासंदर्भातील मुद्दा उपस्थित केला. जय मॉ दुर्गा बचत गट चित्तरंजनपूरच्या ललिता मंडल यांनी अडीच लाख रूपयांचा भ्रष्टाचार केला आहे. त्यांच्यावर कारवाईची मागणी केली. मोहुर्ली येथील रघुनाथ आभारे यांनी अपंगांना घरकूल योजनेचा लाभ मिळत नसल्याने कार्यवाहीची मागणी केली. कोनसरीच्या ग्रा.पं. सदस्य संगीता बारसागडे यांनी घरकुलाचा प्रश्न उपस्थित केला. हातपंप दुरूस्ती कामगार संघटनेचे सुनील कार्लेवार यांनी कामगारांचे मानधन वाढविण्याची मागणी केली. मोंटू हलदर यांनी निर्मल भारत योजनेंतर्गत प्रशासनाचे सहकार्य नसल्याचे सांगितले. आमसभेचे अध्यक्ष डॉ. देवराव होळी यांनी संबंधित अधिकारी व कर्मचारी यांची चौकशी करून त्यांची वेतनवाढ रोखण्याचे निर्देश दिले. संचालन गट शिक्षणाधिकारी दीपक देवतळे तर आभार बीडीओ गोविंद खामकर यांनी मानले. (तालुका प्रतिनिधी)