रेती कंत्राटदाराला १.३३ कोटींचा दंड

By admin | Published: June 7, 2017 01:12 AM2017-06-07T01:12:00+5:302017-06-07T01:12:00+5:30

देसाईगंज तालुक्यातील वैनगंगा नदीतील सावंगी रेती घाटातून प्रमाणापेक्षा अधिक रेतीचे उत्खनन

Penalty of Rs 1.33 crore for sand contractor | रेती कंत्राटदाराला १.३३ कोटींचा दंड

रेती कंत्राटदाराला १.३३ कोटींचा दंड

Next

२४५९ ब्रास रेतीची अवैध वाहतूक
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : देसाईगंज तालुक्यातील वैनगंगा नदीतील सावंगी रेती घाटातून प्रमाणापेक्षा अधिक रेतीचे उत्खनन कंत्राटदाराने अवैधरित्या केले असल्याचे उपविभागीय अधिकारी देसाईगंज यांना आढळून आल्यानंतर रेती कंत्राटदार नजाहत परवेज खान रा.भंडारा यांच्यावर १ कोटी ३२ लाख ७८ हजार ६०० रूपयांचा दंड ठोठावला आहे.
नजाहत खान यांच्या किंझा ट्रेडर्स या कंपनीला सावंगी नदी घाटातील सर्वे क्रमांक २१७ ते २२३ च्या पश्चिमेस चार हेक्टर जागेत २१ हजार २८० ब्रास रेतीचे उत्खनन करण्याची परवानगी देण्यात आली होती. मात्र मोक्यावर जाऊन मोजमाप केले असता, मंजूर क्षेत्रातून ५ हजार १०९ ब्रास रेती व मंजूर क्षेत्राबाहेरील भागातून ११ हजार ५३३ ब्रास रेती असे एकूण १६ हजार ६४२ ब्रास रेतीचे उत्खनन केले असल्याचे आढळून आले. रेती व वाळू वाहतुकीच्या अभिलेखांची तपासणी केली असता, अभिलेखांमध्ये केवळ ८ हजार २४८ ब्रास रेतीचे उत्खनन झाले असल्याचे आढळून आले. त्याचबरोबर नदीच्या किनाऱ्यावर ५ हजार २३५ ब्रास रेती साठवणूक केल्याचे दिसले. अभिलेख व नदी किनाऱ्यावर साठवून ठेवलेली रेती लक्षात घेतली तर कंत्राटदाराने १४ हजार १८३ ब्रास रेतीचे उत्खनन केले असल्याचे निदर्शनास येते. परंतु मोजमापानुसार १६ हजार ६४२ ब्रास रेतीचे उत्खनन झाले आहे. यावरून कंत्राटदाराने २ हजार ४५९ ब्रास रेतीची विनापरवाना वाहतूक केली आहे. त्यामुळे कंत्राटदाराने लिलाव करारनाम्यातील अटी व शर्तींचे उल्लंघन केले असल्याचे आढळून आले. याबाबत कंत्राटदाराला २ मे रोजी नोटीस बजावून त्याचे म्हणणे स्पष्ट करण्यास सांगितले होते. ६ मे रोजी कंत्राटदाराच्या वतीने अमीन परवेज खान व राहूल सतवानी यांनी लेखी उत्तर सादर केले. कंत्राटदाराने केलेले मोजमाप कोणत्याही तांत्रिक अधिकाऱ्यांकडून केले नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे त्यांचे मोजमाप अचूक नाही, हे स्पष्ट होत होते.
कंत्राटदाराने २ हजार ४५९ ब्रास रेतीचे अवैध उत्खनन केल्याचे निकृष्ट झाल्याने प्रती ब्रास ४०० रूपये प्रमाणे ९ लाख ८३ हजार ६०० रूपयांची रॉयल्टी व बाजारमुल्याच्या पाच पट दंड म्हणजेच, पाच हजार रूपये प्रती ब्रास याप्रमाणे १ कोटी २२ लाख ९५ हजार रूपयांचा दंड असा एकूण १ कोटी ३२ लाख ७८ हजार ६०० रूपये दंड आकारण्यात येत असून तो एका आठवड्यात शासनजमा करावा, असे निर्देश देसाईगंजच्या उपविभागीय अधिकाऱ्यांनी कंत्राटदाराला ११ मे रोजीच्या नोटीसमध्ये दिले आहेत.

 

Web Title: Penalty of Rs 1.33 crore for sand contractor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.