पेंढरी तालुक्यासाठी ३० गावांचे नागरिक एकवटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2019 12:00 AM2019-02-04T00:00:00+5:302019-02-04T00:01:08+5:30
तालुक्यातील मोहगाव येथे ३० गावांच्या ग्रामसभांची बैठक शनिवारी पार पडली यात पेंढरी गावाला तालुक्याचा दर्जा देण्यात यावा असा ठराव मंजूर करण्यात आला. तालुक्याच्या मागणीसाठी १९ फेब्रुवारी रोजी चक्काजाम आंदोलन करण्याचा निर्धार करण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
धानोरा : तालुक्यातील मोहगाव येथे ३० गावांच्या ग्रामसभांची बैठक शनिवारी पार पडली यात पेंढरी गावाला तालुक्याचा दर्जा देण्यात यावा असा ठराव मंजूर करण्यात आला. तालुक्याच्या मागणीसाठी १९ फेब्रुवारी रोजी चक्काजाम आंदोलन करण्याचा निर्धार करण्यात आला.
धानोरा तालुक्याची लोकसंख्या कमी असली तरी या तालुक्याचा विस्तार फार मोठा आहे. या तालुक्याची सीमा छत्तीसगड राज्याला लागून आहे. सीमेला लागुन असलेल्या गावांचे तालुका मुख्यालयापासूनचे अंतर सुमारे ८० किमीच्या जवळपास आहे. अनेक गावे पायवाटेने जोडले आहेत. जिल्हा मार्गांची अवस्था अतिशय वाईट आहे. वाहतुकीची साधनेही उपलब्ध नाहीत. त्यामुळे एखाद्या प्रशासकीय कामासाठी तालुका मुख्यालयी पोहचून परत येणे शक्य होत नाही. परिणामी नागरिक योजनांच्या लाभापासून वंचित आहेत. अशिक्षित नागरिक प्रशासकीय काम करण्यासाठी तालुकास्थळी पोहोचत नाही. पेंढरी हे परिसरातील सर्वात मोठे गाव आहे. या गावाच्या परिसरात जवळपास ४० ते ५० गावे आहेत. पेंढरीला तालुक्याचा दर्जा दिल्यास नागरिकांना सोयीचे होईल ही बाब लक्षात घेऊन पेंढरीला तालुक्याचा दर्जा देण्याची मागणी होत आहे. यासाठी यापूर्वीही अनेकवेळा आंदोलने करण्यात आली. मात्र शासन याकडे दुर्लक्ष करीत आहे.
पेंढरी पासून जवळच असलेल्या मोहगाव येथे इलाक्यातील ३० गावांची ग्रामसभा काशीनाथ आतला यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या सभेत पेंढरी गावाला तालुक्याचा दर्जा देण्यासाठी आरपारची लढाई करण्याचा निर्धार व्यक्त केला. पेंढरी येथे १९ फेब्रुवारी रोजी रास्ता रोको आंदोलन केले जाईल. या आंदोलनाला परिसरातील ४० ते ५० गावचे नागरिक, सरपंच, ग्रामसभा अध्यक्ष उपस्थित राहतील, असाही निर्णय घेण्यात आला. सभेला जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीनिवास दुलमवार, सरपंच सुगंधा आतला, उपसरपंच दिनेश टेकाम, देवसाय आतला, बावसू पावे, मनिराम आतला यांच्यासह ग्रामसभांचे अध्यक्ष व सदस्य उपस्थित होते. उपस्थितांचे आभार ग्रामसेवक जयंत मेश्राम यांनी मानले.