सातव्या वेतन आयोगाच्या पहिल्या हप्त्याची रक्कम प्रलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2021 04:32 AM2021-03-14T04:32:21+5:302021-03-14T04:32:21+5:30
प्रत्येक वर्षात १ जुलै रोजी ही रक्कम अदा केली जाईल. जून महिन्याच्या वेतनात कर्मचाऱ्यांना पहिला हप्ता मिळणार आहे, असे ...
प्रत्येक वर्षात १ जुलै रोजी ही रक्कम अदा केली जाईल. जून महिन्याच्या वेतनात कर्मचाऱ्यांना पहिला हप्ता मिळणार आहे, असे सांगण्यात आले होते. महाराष्ट्र राज्यातील जवळपास संपूर्ण जिल्ह्यात डीसीपीएसधारकांना पहिला हप्ता रोखीने मिळाला आहे. मात्र, गडचिरोली जिल्ह्यातील खासगी अनुदानित, माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांना वेतन आयोगाचा पहिला हप्ता गेल्या दोन वर्षांपासून मिळालेला नाही. एकीकडे शासन जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांना तसेच इतर विभागातील कर्मचाऱ्यांनाही वेतन आयोगाचा पहिला हप्ता देण्यात आला. मात्र, खासगी अनुदानित विद्यालयातील कर्मचाऱ्यांना वेतन आयोगाचा पहिला हप्ता द्यायला उशीर करीत शासन दुजाभाव करीत असल्याचे चित्र दिसत आहे.
महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांतील डीसीपीएसधारकांना सातव्या वेतन आयोगाचा पहिला हप्ता मिळाला आणि दुसरा हप्ता शासन आदेशानुसार यावर्षी जुलै महिन्यात मिळणार आहे. मात्र, जिल्ह्यातील खासगी अनुदानित विद्यालयातील प्राथमिक, माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयातील डीसीपीएस कर्मचाऱ्यांना अजूनही सातव्या वेतन आयोगाचा पहिला हप्ता मिळाला नाही तर दुसरा हप्ता कसा मिळेल, असा प्रश्न शिक्षकांना पडत आहे. त्यामुळे लवकरात लवकर पहिल्या हप्त्याच्या थकबाकीच्या निधीची तरतूद करून व्याजासकट जिल्ह्यातील सर्व खासगी अनुदानित, माध्यमिक, कनिष्ठ महाविद्यालयांतील कर्मचाऱ्यांना पहिला हप्ता मिळावा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष संतोष सुरावार तसेच महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटना शाखा चामोर्शीचे तालुकाध्यक्ष प्रवीण पोटवार, सचिव सुजित दास, रोशन थोरात यांनी केली आहे.