पेन्शन हक्क आंदोलक पोहोचले शिवनेरीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2018 12:56 AM2018-09-30T00:56:27+5:302018-09-30T00:58:22+5:30
२००५ नंतर नियुक्त झालेल्या सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, या मागणीसाठी राज्यभरातील कर्मचाऱ्यांनी शिवनेरी किल्ला ते मुंबई पर्यंत पेन्शन रन व पेन्शन दिंडी काढली जात आहे. या आंदोलनात गडचिरोली जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांनी सुध्दा सहभाग नोंदविला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : २००५ नंतर नियुक्त झालेल्या सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, या मागणीसाठी राज्यभरातील कर्मचाऱ्यांनी शिवनेरी किल्ला ते मुंबई पर्यंत पेन्शन रन व पेन्शन दिंडी काढली जात आहे. या आंदोलनात गडचिरोली जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांनी सुध्दा सहभाग नोंदविला आहे.
सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करावी, यासाठी जुनी पेन्शन हक्क संघटनेचे कर्मचारी मागील अनेक वर्षांपासून आंदोलने करून आपल्या मागण्यांसाठी लढा देत आहेत. मात्र शासन याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करीत आहे. जुनी पेन्शन लागू करण्यास शासनाला बाध्य करण्यासाठी राज्यभरातील कर्मचाऱ्यांनी शिवनेरी ते मुंबई पर्यंत आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या टप्प्यात शिवनेरी किल्ल्यापासून पेन्शन रनला सुरूवात झाली. ही पेन्शन रन ठाणे येथे २ आॅक्टोबर रोजी पोहोचणार आहे. यामध्ये राज्यभरातील हजारो कर्मचारी सहभागी झाले आहेत. गडचिरोली जिल्ह्यातून महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेचे जिल्हाध्यक्ष गुरूदेव नवघडे, जिल्हा उपाध्यक्ष अंकूश मैलारे, जिल्हा सरचिटणीस बापू मुनघाटे, धानोरा तालुका अध्यक्ष दीपक सुरपाम, कुरखेडा तालुका अध्यक्ष गणेश आखाडे, अहेरी तालुका अध्यक्ष राजू सोनटक्के, प्रसिध्दी प्रमुख प्रविण धुडसे, संतोष धानोरकर यांच समावेश आहे. २ आॅक्टोबरपासून ठाणे येथून पेन्शन दिंडी काढली जाणार आहे.
या पेन्शन दिंडीत गडचिरोली जिल्ह्यातील जवळपास दीड हजार कर्मचारी सहभागी होणार आहेत, अशी माहिती संघटनेचे जिल्हाध्यक्ष गुरूदेव नवघडे, जिल्हा सरचिटणीस बापू मुनघाटे यांनी दिली आहे.