लसीकरणापासून वंचित जमगाव व जडेगावच्या लाेकांनी अखेर घेतला डाेस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2021 04:40 AM2021-08-28T04:40:59+5:302021-08-28T04:40:59+5:30
गडचिराेली तालुक्यातील पाेटेगाव प्राथमिक आराेग्य केंद्रांतर्गत जमगाव व जडेगाव ही गावे येतात. जमगाव येथे आराेग्य उपकेंद्र आहे. हा ...
गडचिराेली तालुक्यातील पाेटेगाव प्राथमिक आराेग्य केंद्रांतर्गत जमगाव व जडेगाव ही गावे येतात. जमगाव येथे आराेग्य उपकेंद्र आहे. हा परिसर अतिशय दुर्गम असून जंगलव्याप्त आहे. दाेन्ही गावे एटापल्ली तालुक्याच्या सीमेला लागून आहेत. सर्वच गावांमध्ये काेराेना प्रतिबंधक लसीकरण पार पडले; परंतु या दाेन्ही गावांत एकाही नागरिकाने प्रतिबंधक लसीचा डाेस घेतला नव्हता. ही बाब आराेग्य विभागाच्या लक्षात येताच २५ ऑगस्ट राेजी काेराेना प्रतिबंधक लसीकरणाचे नियाेजन करण्यात आले.
लसीकरणाच्या अनुषंगाने जडेगाव येथे दवंडी पिटवून जनजागृती करण्यात आली, तसेच लसीकरणाबाबत नागरिकांमध्ये असलेल्या शंका व कुशंकांचे निरसन करण्यात आले. लाेकांना प्राेत्साहित करून लसीकरणासाठी प्रवृत्त केले. त्यानंतरच लसीकरण शिबिराचे उद्घाटन मान्यवरांच्याहस्ते करण्यात आले. त्यानुसार जमगाव येथे १८, तर जडेगाव येथे ३२ लाेकांना काेराेना प्रतिबंधक लस देण्यात आली.
याप्रसंगी तहसीलदार महेंद्र गणवीर, संवर्ग विकास अधिकारी मुकेश माहाेर, तालुका आराेग्य अधिकारी डाॅ. सुनील मडावी, जमगावचे सरपंच देविदास मडावी, उपसरपंच जयवंता नराेटे, ग्रामसेवक नैताम, तलाठी वासनिक, समुदाय आराेग्य अधिकारी डाॅ. माेहाेड, आराेग्य सेविका लाेणारे, लसीकरण संनियंत्रक गेडाम, तालुका समूह संघटक नरेंद्र म्हशाखेत्री, आराेग्य सहायक भजभुजे व कर्मचारी उपस्थित हाेते.
बाॅक्स
लसीकरण वाहनाचे उद्घाटन
ग्रामीण भागात लसीकरणासाठी ये-जा करण्याकरिता तालुक्यास प्राप्त झालेल्या पहिल्याच नवीन लसीकरण वाहनाचे उद्घाटन तहसीलदार महेंद्र गणवीर यांच्याहस्ते जडेगाव येथे केले. या वाहनामुळे ग्रामीण तसेच दुर्गम भागातील गावांमध्ये लसीकरणासाठी ये-जा करण्यास आराेग्य चमूसाठी साेयीचे बनले आहे.
270821\27gad_2_27082021_30.jpg
जडेगाव येथे लसीकरणासाठी पाेहाेचलेली अधिकाऱ्यांची चमू.